मंत्री डॉ आत्राम यांना सुरजागड विरोधातील खदखदीचा फटका बसणार?

लोहखनिज उत्खनन व्यवस्थापनाच्या दादागिरीने वाहतूकदार व कामगार त्रस्त!

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील सुरजागड प्रकल्प सुरू करण्याचे श्रेय निर्विवादपणे नामदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना जाते. तसे त्यांनी अनेकदा विविध सभा व कार्यक्रमांमधून जाहीरही केले आहे. मात्र याच सुरजागड लोकखनिज प्रकल्प व्यवस्थापनाच्या दादागिरीला वाहतूकदार व कामगार त्रस्त झाले असल्याचे बोलल्या जात आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नामदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना सुरजागड लोहखनिज उत्खनन विरोधातील खदखदीचा फटका बसण्याची शक्यता नागरिकांमधील चर्चेतून दिसून येत आहे.

मागील विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेऊन, आदिवासी समाजाच्या हक्काची जल, जंगल व जमिन रक्षणाच्या मुद्यावर डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना घवघवीत मताधिक्य मिळून ते राज्य विधानसभेत आमदार म्हणून पोहचले होते, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलवून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या प्रश्नावर गेली पाच वर्षापासून ते सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे विकासात्मक फायदे जनतेला सांगून, प्रकल्पाच्या समर्थानात उभे झाले आहेत. हे विशेष!

त्यावेळी त्याच्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधातील भूमिकेला अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा या पाचही तालुक्यातील सुरजागड लोहखनिज विरोधातील आंदोलक व ग्रामसभांनी समर्थन दिले होते, तसेच गेल्या एक वर्षांपूर्वी आणखी काही प्रस्तावित लोहखनिज खदानी विरोधातील अतिदुर्गम तोडगट्टा गावातील आंदोलनाला मंत्री डॉ आत्राम यांनी प्रत्येक्ष भेट देऊन समर्थन दिले होते. त्यावेळीही त्यांच्या या भूमिकेची मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेऊन त्यांची राज्य मंत्री मंडळातील अन्न व औषधी प्रशासन खात्याच्या मंत्री पदावर वर्णीची लॉटरी लागली असल्याचे बोलल्या जात आहे.

अहेरी विधानसभा निवडणूकीत आदिवासी व पारंपरिक वन निवासी मतदारांकडून जल, जंगल, जमीन बचाव व लोहखनिज उत्खनन विरोधातील आंदोलन हा कळीचा मुद्दा आहे. अशा आंदोलनातील आदिवासी समाज व ग्रामसभांच्या समर्थानात उतरणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनतेने नेहमीच झुकते माप देऊन विजयी केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ नामदेव किरसान यांनी याच मुद्द्यांना समर्थन दर्शविल्याने त्यांना ग्रामसभांच्या पाठबळावर देशाच्या लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी प्राप्त झाली आहे, हे विसरता येणार नाही!

सुरजागड प्रकल्पाच्या विरोधात व जल, जंगल, जमिनीच्या रक्षणार्थ उभे राहणाऱ्या अनेकांना स्थानिक आदिवासी व पारंपरिक निवासी नागरिकांनी घवघवीत मतदान करून उच्च पदावर विराजमान होण्याची संधी दिली आहे. मात्र स्थानिक आदिवासी तसेच पारंपरिक निवासी नागरिक, प्रकल्पातील लोहखनिजाचे वाहतूकदार व कामगारांना कंपनी व्यवस्थापनाच्या दादागिरी व हेकेखोर धोरणावर कोणत्याही राजकीय पक्ष, पुढाऱ्यांची जनसामान्यांना कधीही मदत मिळाल नसल्याची नाराजी सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना सुरजागड विरोधातील नाराजी व खदखदीचा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.