अस्मिता बेडलवार हिची नेट परीक्षेत उतुंग भरारी!

अतिदुर्गम, नक्षल प्रभावी तलवाडा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

अहेरी; (गडचिरोली)
तालुक्यातील तलवाडा येथील अस्मीता लक्ष्मण बेडलवार हिने विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडून घेण्यात आलेल्या जून २०२४ च्या नेट परीक्षेत समाजशास्त्र या विषयात उतुंग भरारी घेत ९८:५९ टक्के गुण प्राप्त केले आहे. त्यामुळे अतिदुर्गम, मागास, नक्षल प्रभावी तलवाडा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अस्मिता ही मुलाची तलवाडा या छोट्याशा खेड्यातील रहिवासी असुन तिचे वडील लक्ष्मण बेडलवार हे महसूल विभागात शिपाई या पदावर कार्यरत होते, त्यांचे तीन वर्षांपूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय अहेरी येथे कर्तव्यावर असतांना कोरोना आजाराने निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर अस्मिताला शिक्षण घेतांना, बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागली आहे. मात्र तिने खचून न जाता परिस्थितीचा सामना करून जिद्दीने केंद्रीय लोकसेवा आयोग व तत्सम स्पर्धा परीक्षांचा जोमाने अभ्यास केला आहे. त्यामुळे तिच्या जिद्दीचे फलित होऊन विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेत तिने उतुंग भरारी घेत समाजशास्त्र या विषयात उच्च पदस्थ प्राध्यापक होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

अस्मिताचे प्राथमिक शिक्षण तलवाडा या गावातील शाळेत तर माध्यमिक शालांत शिक्षण आलापल्ली येथे झाले आहे. तिने दहावीत ९२ टक्के गुण संपादन केले होते, त्यानंतर पुणे येथील नामांकित विद्यालयाच्या कला शाखेतून बारावीची परीक्षेत ८७ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली होते. पदवीचे शिक्षण घेऊन तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीत असतांनाच अस्मिताच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनामुळे अस्मिताचे कुटुंब फार मोठ्या आर्थिक अडचणीत आले होते, त्यामुळे अस्मिताने आपले ध्येय्य सफल करण्याच्या दृष्टीने समाजशास्त्र या विषयात नेट परीक्षा देण्याचे ठरविले, आणि त्याच दृष्टीने तिने आपल्या अभ्यासाची तयारी पूर्ण केली, पहील्याच प्रयत्नात तीने गुणांकन यादीत ९८:५९ टक्के गुण घेऊन ही परीक्षा पास केली आहे. अस्मिताच्या या उतुंग भरारीचे तिचे गुरुवर्य, नातेवाहिक, मित्रमैत्रिणी व गावकरी नागरिकांकडून कौतुक केले जात असून या सर्वांकडून तिला संपर्क करून तिच्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.