चिकणीच्या वार्ड क्रमांक एक मध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याला धोका!

गटार नालीतील सांडपाणी रस्त्यावर, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

नेर;(यवतमाळ)
तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथील वार्ड क्रमांक एक मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून गटार नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून, रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे घाण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी सिद्धार्थ लांजेवार व नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गावात साथ रोगांचा प्रादुर्भाव असून नागरिक अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. अशातच गेली एक महिन्यांपासून वार्ड क्रमांक एक मधील वशिष्ठ चव्हाण ते ग्रामपंचायत सदस्या सुनीता भोयर यांच्या घरापर्यंत चारशे मीटर अंतररावरील रस्त्यावर गटार नालीचे सांडपाणी वाहून सर्वत्र घाण पसरली आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, लहान बालके, वयोवृद्ध व सामान्य नागरिकांना नाक दाबून रहदारी करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा त्या रस्त्यावरून चालतांना लहान बालके व वयोवृद्ध नागरिक घाण चिखलावरून घसरून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात काहींना कोरकोड दुखापतीही झाल्या आहेत. मात्र अशा गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपयोजना केल्या जात नसल्याने प्रशासना विरुद्ध नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे वार्ड क्रमांक एक मधील गटार नालीतील घाण सांडपाण्याची विल्हेवाट लावून नागरिकांना होणारा रहदारीचा त्रास व आरोग्याच्या समस्येचे निवारण करण्याची मागणी सिद्धार्थ लांजेवार व नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सदरच्या वार्ड क्रमांक एक मध्ये गटार नालीतील घाण सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे ग्रामसेविका निकिता इंगोले, यांनी “जनकत्व” न्युज नेटवर्कशी बोलतांना सांगितले असून, प्रशासनाकडून घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नालीच्या शेजारी शोषखड्डा तयार करून रस्त्यावरून वाहणारे घाण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश सफाई कामगार व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात वरील समस्या निकाली काढली जाईल. अशी हमी ग्रामसेविका निकिता इंगोले यांनी दिली आहे.