निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांना दिले निवेदन तथा प्रस्तावाची प्रत!
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत एकरा (बूज) या गावापासून आलदंडी या गावापर्यंत दहा किमी अंतराचा नवीन रस्ता व रस्त्यात पडणाऱ्या नाल्यांवरील पुलांची निर्मिती करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य संगिता दुर्वा व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी तोडसा ग्रामपंचायतने ग्रामसभेत संर्वानुमाते मंजुरी दिलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी पंडा यांना देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना (दि. ०६ मार्च) गुरुवारी दिलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार नामदेव किरसान यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनातून एकरा व परिसरातील सात ते आठ गावांच्या नागरिकांना आलदंडी व परिसरातील अनेक गावांना ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही, त्यामुळे प्रवाशी नागरीकांना लांबच्या रस्त्यावरून वळसा घेऊन जाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एकरा (बूज), एकरा (खुर्द) तोडसा, आलेंगा, लांजी, दोड्डी, कारमपल्ली, पेठा, झारेवाडा, आदी गावातील नागरिकांचे आलदंडी, उडेरा, तुमरगुंडा, बुर्गी, परसलगोंदी, रेकणार या गावात नेहमीच येणे-जाणे आहे. सदरच्या गावांचा रहदारी प्रवास करण्यासाठी नागरिकांना तालुका मुख्यालय एटापल्लीवरून जाण्याचा पक्का रस्ता आहे. मात्र या रस्त्यावरून जातांना वीस ते पंचवीस किमी अगाऊ वळण प्रवासाची पायपीठ करावी लागत आहे. असा प्रवास करतांना परिसरातून कोणत्याही प्रकरणही शासकीय प्रवाशी बससेवा उपलब्द नाही, त्यामुळे प्रवाशी नागरिकांना खाजगी प्रवाशी वाहतूक सेवेशिवाय गत्यंतर राहत नाही. खाजगी प्रवाशी सेवा घेतांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करण्यासह आर्थिक भुदंड प्रवाशांना सोसावे लागत असल्याचे निदर्शन निवेदनातून नोंदविण्यात आले आहे.
त्यामुळे एकरा (बूज) ते आलदंडी अशा दहा किमी अंतराच्या रस्त्याची व मार्गात पडणाऱ्या दोन नाल्यांवरील पुलांची निर्मिती करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य संगिता दुर्वा, माजी सरपंच साधू गावडे, दुलसा पुंगाटी, कन्ना नरोटी, चंदू आत्राम, सुरेश दुर्वा, माणिक पुंगाटी, मारोती उसेंडी, सुधाकर नरोटी, बालकु गोटा, अश्विन आत्राम, सूरज गोटा, रामजी नरोटी, कटिया पुसली व गावकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. रस्त्याची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा गावकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. (जनकत्व वृत्तसेवा, दिनांक ०७ मार्च २०२५)