गडचिरोली;
जिल्ह्यातील उन्हाळी पिके उत्पादक शेतकऱ्यांना गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची नितांत गरज असून शासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतीसाठी उपलब्द करून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. अन्यथा वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
जिल्हा अतिदुर्गम व मागास असून बहुतांश कुटुंबाचा मुख्य रोजगार शेतीवर अवलंबून असून जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पर्लकोटा, गाढवी, बांडे, पामुलागौतम, अशा नद्यांसह अनेक नाले आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन तर कधी गोसिखुर्द धरणातील विसर्ग व मेडीगट्टा धरणातील बॅग वाटरच्या पुरस्थितीतुन शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसून फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, सदरच्या नुकसानीची थोडीफार भरपाई भरून काढण्यासाठी नदी पात्र परिसरातील शेतकरी उन्हाळी पिक घेतात, मात्र गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिके घेतांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. परिसरातील पाळीव व जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत, असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
नदी पात्र परिसरातील गावांच्या भूजल पातळीतही कमालीची घसरण झाल्याने अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, सदर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन आठ दिवसांत गोसीखुर्द धरणातील पाणी शेती पिकांसाठी उपलब्द करून देण्याची मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. सदरची मागणी येत्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास जिल्हा काँग्रेस, शेतकरी व नागरिकांच्या वतीने वैनगंगा नदी पात्रात तीव्र ठीय्या आंदोलन उभारणार असल्याचा इशारा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्रातून दिला आहे.