एटापल्ली; (गडचिरोली)
येथील बंद असलेल्या जिल्हा परिषद समूहनिवासी वसतिगृहाच्या निरलेखित इमारतीला भर उन्हात लागलेली आग, नगरपंचायत अग्निशमन पथकाकडून तत्परतेने विझविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. निर्लेखीत इमारतीला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत.
उन्हाळ्याच्या तापमानाने काहूर माजविले असतांना (दि. ०७ एप्रिल) सोमवारी सकाळी अकरा वाजता दरम्यान बंद असलेले जिल्हा परिषद समूहनिवासी शासकीय वसतिगृह इमारतीला अचानक आग लागून धूर बाहेर निघायला लागला, ही बाब काही अंतरावर असलेल्या कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनात आली, नागरिकांकडून घटनेची माहिती गटशिक्षणाधिकारी हृषीकेश बुरडकर यांना कडविण्यात आली, बुरडकर यांनी प्राप्त माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना सांगून अग्निशमन यंत्रणेच्या मदतीची मागणी केली होती. आगीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी तांबे यांनी कोणताही विलंब न लावता अग्निशमन पथकाला आग लागलेल्या घटनास्थळी रवाना केले. त्यामुळे आगीने उग्ररूप धारण करण्यापूर्वीच अग्निशमन पथकाला आग विझविण्यास यश प्राप्त झाल्याचे बोलल्या जात आहे,
गेली तीन वर्षांपासून समूहनिवासी वसतिगृह जिल्हा परिषद प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे ही इमारत अडगळीस पडलेली आहे. तीन वर्षांपूर्वी निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वापरातील जुन्या गाद्या, चादरी, ब्लॅंकेट, काही कापडी व लाकडी साहित्य आग लागलेल्या इमारतीत आहेत. याच साहित्याला अचानक आग लागून धूर बाहेर आल्याचे नागरिकांच्या निदर्शनात आले होते.
आग नितंत्रण पथकाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी रसाळ, अग्निशमन अधिकारी शंतनू मुनघाटे, अभियंता विवेक साखरे, लिपिक प्रमोद कपाटे, कर्मचारी रमेश मडावी, संदीप मोहुर्ले व किशोर मोहुर्ले यांनी केलेल्या कसोशीच्या प्रयत्नातून समूहनिवासी वसतिगृह इमारतीचे दारे व खिडक्या तोडून आत पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करून लागलेली आग तत्परतेने विझविण्यास यश मिळविले आहे. सदरच्या इमारतीतील वसतिगृह बंद असल्याने कोणतेही विद्यार्थी इथे मुक्कामी राहत नाहीत. त्यामुळे जीवित हानी व इमारत निर्लेखीत असल्याने कोणतीही वित्त हानी झालेली नाही. आग विझवितांना जवळपास नागरी वस्ती नसल्यामुळे अग्निशमन पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रणात मिळविण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टाळण्यात यश मिळाले आहे. संशयास्पद वसतिगृह इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.