मला बाळं झालं मी घरी येते, चंद्रपुरात 4 दिवसाच्या बाळाची चोरी

चंद्रपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

News34 chandrapur

 

चंद्रपूर – जिल्हा सामान्य रुग्णालय (वैद्यकीय महाविद्यालय ) मध्ये आज 20 जून ला सकाळी 3 दिवसांच्या बाळाची चोरी करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
सकाळी 6 वाजता घडलेल्या या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

17 जून ला मीरा धात्रक या महिलेची प्रसूती जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली होती, मीरा ला मुलगा झाला, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, मात्र एका महिलेची वक्रदृष्टी त्या बाळावर होती, मागील 3 दिवसापासून प्रसूती कक्षात हिंगणघाट निवासी जेबा सुभान शेख नामक महिला फिरत होती.
जेबा ने प्रसूती कक्षात जात मिराशी मैत्री केली, तिचा विश्वास संपादन केला, 3 दिवसात दोघ्या चांगल्या मैत्रीण बनल्या.

 

जेबा 3 दिवसापासून मीरा ला माझे नातेवाईक या ठिकाणी भरती असल्याचे सांगत होती, त्यामुळे तिच्यावर कुणी संशय केला नाही, 20 जून मंगळवारी सकाळी 6 वाजता जेबा ने मीरा च्या कुशीत असलेले बाळ उचलत त्याठिकाणांहून ऑटो पकडत बस स्थानक गाठत हिंगणघाट च्या दिशेने निघाली.

 

बाळ चोरी गेले हे कळताच मीरा ने रुग्णालयात हंबरडा फोडला, बाळाचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठे आढळून आला नाही, याबाबत पोलिसात तक्रार दिली, चंद्रपूर शहर पोलीस रुग्णालयात दाखल झाले, तपास सुरू झाला, रुग्णालयात असलेले कॅमेरे तपासण्यात आले, त्यामध्ये महिलेचा संपूर्ण प्रकार कैद झाला.

 

पोलिसांनी रुग्णालयात विचारपूस केली, ज्या ऑटो मध्ये महिला गेली त्या ऑटो चालकाला विचारपूस करण्यात आली, माहिती घेत बस स्थानक परिसर गाठत एसटी कंट्रोल मध्ये त्या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती दिली असता त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले व पुढील माहिती घेत.

अशी झाली अटक

वरोरा पोलीस स्टेशन, वर्धा पोलीस स्टेशन, चंद्रपूर पोलीस, एसटी कंट्रोल रूम व महामार्ग पोलीस यांना सूचित करीत सर्व चमुना अलर्ट केले, आणि आरोपी महिलेला हिंगणघाट येथून वर्धा पोलीस चे क्राईम युनिट प्रमुख सपोनि संदीप कापडे व सपोनि विनीत घागे यांनी ताब्यात घेतले.
आरोपी महिलेला बाळासाहित ताब्यात घेत वरोरा पोलिसांच्या सुपूर्द केले.

वरोरा पोलिसांनी आरोपी महिलेला चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात दिले, याबाबत अधिक माहिती घेतली असता पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सांगितले की आरोपी महिलेने बाळ चोरल्यावर तात्काळ पळ काढला मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अवघ्या 3 तासात गंभीर गुन्ह्याचा छडा लावला.

व्हाट्सएप मॅसेज

विशेष म्हणजे मीरा च्या बाळाचा फोटो जेबा ने आपल्या नातेवाईकांना पाठविला होता, मला बाळ झालं मी घरी येत आहे असा संदेश सुद्धा जेबा ने नातेवाईकांना दिला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात याआधी सुद्धा बाळ चोरीच्या घटना घडल्या आहे, मात्र अजूनही 2 घटनेत बाळाचा शोध लागला नाही, त्यानंतर सुद्धा रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली नाही.
याबाबत मेडिकल कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवला आहे.