आश्रम शाळेत स्वच्छता व सोयीसुविधा पुरविण्याची मागणी,

अन्यथा आंदोलन वेनहारा गोटूल समितीचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील कसनसुर येथील शासकीय आश्रम शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरविण्याची मागणी सरपंच कमल हेडो, वेनहारा गोटूल समिती अध्यक्ष सुधाकर गोटा, राजू गोमाडी, विलास कोंदामी व पालकांनी प्रकल्प अधिकारी आदित्य जीवने यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

वेनहारा इलाका पारंपरिक गोटूल समितीने दिलेल्या निवेदनातून विद्यार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली असून गेली दोन वर्षांपासून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सात वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकाच शिक्षक कार्यरत असल्याने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे निवेदनात नमूद केले आहे, शाळा परिसरात इमारत बांधकाम कंत्राटदाराने टाकलेले लोखंडी सळाखी व इतर साहित्यामुळे विद्यार्थ्यांना परिसरात वावरतांना शारीरिक इजा पोहचण्याचा धोका निर्माण असून परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, शाळा परिसरातील वीज पुरवठा नेहमीच खंडित होत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उपलब्द असलेले बंद अवस्थेतील जनरेटर सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.

त्यामुळे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक, मूलभूत सोयीसुविधा पुरवून स्वच्छता राखण्याची मागणी वेनहारा इलाका पारंपरिक गोटूल समिती अध्यक्ष सुधाकर गोटा, सरपंच कमल हेडो, सचिव राजू गोमाडी, विलास कोंदामी, दशरथ पोटावी, सैनू झोरे, बेबी हेडो, मैनू लेकामी, मंगु गोमाडी, विकास पुंगाटी व पालक नागरिकांनी प्रकल्प अधिकारी आदित्य जीवने यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा विद्यार्थी व पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.