जनद्रोही, पोलीस मदतगार असल्याचा पत्रकातुन आरोप, बेदम मारहाण व गळा आवळून घेतला जीव,
भामरागड; (गडचिरोली)
पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम महागु मडावी (४६) रा. कियर, यांना नक्षल्यांनी बेदम मारहाण व गळा आवळून त्यांची हत्या केली आहे. जनद्रोही पोलिसांचा सहकारी असल्याचा आरोप मृतदेह शेजारी टाकलेल्या पत्रकात करण्यात आला असून पोलिसांना मदत करणाऱ्या सुखराम सारख्यांना सोडले जाणार नाही असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र दहशत पसरली आहे.
सुखराम मडावी हे कियर येथील आपल्या राहते घरी (१ फेब्रुवारी) शनिवारी झोपलेले असतांना रात्री ११ वाजताच्या सुमारास काही नक्षली सुखराम मडावी यांना झोपेतून उठवून गावाबाहेरच्या क्रिकेट ग्राऊंडवर घेऊन गेले, यावेळी नक्षल्यांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांचे तोंड बांधून गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुखराम मडावी यांच्या हत्येनंतर नक्षल्यांनी मृतदेह शेजारी काही पत्रके टाकली आहेत. पत्रकातुन जनद्रोही सुखराम मडावी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, कउंडे, पेनगुडा, आलदंडी, पोयोरकोटी, मिडगूरवेचा, अशा अनेक गावांत आमच्या जन आंदोलक कार्यकर्त्यांना पकडून देऊन कारागृहात डांबन्यात सुखरामचा हात आहे, तसेच सुखराम मडावी याने ग्रामसभा, पेसा कायद्याच्या विरोधात जाऊन पेनगुडा गावात नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात पोलिसांना सहकार्य केल्याचाही आरोप पत्रकात केला आहे. वेगवेगळ्या खनिज खदानींसाठी कार्पोरेट घराण्यांच्या कंपन्यांना सुखराम व त्याच्या सारख्या आणखी लोकांकडून मदत केली जात असल्याचे नमूद करून अशा पोलिसांना मदत करणाऱ्या दलालांना सोडले जाणार नाही असा गंभीर इशारा पत्रकातून देण्यात आला आहे. शेवटी गडचिरोली डिवीजन कमेटी भाकपा माओवादी असा उल्लेख पत्रकातून करण्यात आला आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या कठोर धोरणामुळे गेली चार ते पाच वर्षात नक्षल चळवळ थंडावलेल्या स्थितीत असतांनाच माजी सभापती सुखराम मडावी यांच्या सारख्या एका बड्या नेत्याची हत्या नक्षल्यांकडून करण्यात आल्यामुळे नक्षली रडारवरील काही राजकीय पुढारी, पोलीस खबरी व नागरिकांचे धाबे दणाणले आहे. घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून घटनेचा पुढील तपास भामरागड पोलिसांकडून केला जात आहे. गडचिरोली जिल्हा पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.