सत्तासमर्थकांसाठी दिशादर्शक तर विरोधकांसाठी दिशाहीन?
गडचिरोली;
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी व विरोधी पक्षांतील मान्यवरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, सत्तासमर्थकांकडून दिशादर्शक म्हणून गवगवा तर विरोधकांकडून दिशाहीन म्हणून अवहेलना करून अर्थसंकल्पाची खिल्ली उडविण्यात आली आहे.
राज्य विधिमंडळ अधिवेशनात (ता.२८जून) शुक्रवारी वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याला प्रगती व विकासाला नवी चालना देणारा निर्धारपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी फाटलेल्या विकासाला फसव्या घोषणांचे ठिगळ लावून चमकविण्याचा लाजिरवाणे प्रयत्न असल्याची जळजळीत व तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केले आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात रयतेच्या स्वप्नातील कल्पक चौफेर विकास साधणारा अर्थसंकल्प म्हणून स्तुती सुमने उधळली आहेत,
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत आपटलेल्या सत्ताधाऱ्यांनी उभारीचा टेकू घेऊन सैरभर धावण्यासाठी आपसी त्रिकुटात लावलेली शर्यत या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याची बोचरी टीका व्यक्त केली आहे.
खासदार डॉ नामदेव किरसान यांनी मागास, दलित व आदिवासींसाठी निराशादायक अर्थसंकल्प असल्याचे व राज्य सरकार मागासवर्गीय समाजाशी कसा दुजाभाव करते हे या अर्थसंकल्पात दिसून आल्याचे निदर्शन त्यांनी नोंदविले,
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासणारा व सर्व समावेशक अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
माजी खासदार अशोक नेते यांनी शेतकरी, महिला व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी वाव देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जणू अवकाळी पावसात नदी नाले भरून वाहतांनाची फसवे चलचित्र दाखवणारी रील प्रमाणे घोषणांचं बाजार उभा करणारा अर्थसंकल्प अशी तीव्र व तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
अशाप्रकारे सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांतील मान्यवरांनी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर समर्थनीय व विरोधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे सादर झालेल्या अर्थसंकल्पात आगामी होऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा प्रभाव मात्र स्पष्ट जाणवत असल्याची बाब जनतेपासून लपून राहत नाही. हे मात्र नक्की!