मंजूर ३३ के व्ही विद्युत उपकेंद्राची निर्मिती थंड बस्त्यात?

अंधारातील ५१ गावांना पंधरा वर्षांपासून वीज रोषणाईची प्रतीक्षा!

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील महसुली मंडळ कसनसुर येथील शासन मंजूर ३३/११ के व्ही उपकेंद्राची निर्मिती पंधरा वर्षांपासून रखडलेली असून विद्युतीकरणाची समस्या लक्षात घेऊन उपकेंद्राची निर्मिती त्वरित करण्याची मागणी ग्रामपंचायत कसनसुरच्या सरपंच कमल हेडो, कोटमीच्या सरपंच सिंधू मोहंदा, वाघेझरीचे सरपंच विलास कोंदामी, उपसरपंच देवीदास मट्टामी, महादेव पदा, सुधाकर गोटा, व नागरिकांनी जिल्हाधिकारी संजय दैनी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे,

राज्य शासनाने पूर्व विदर्भ विकास योजना अंतर्गत सन २००९ मध्ये कसनसुर परिसरातील एकावन्न गावांचा अंधार दूर करण्याच्या दृष्टीने ३३/११ के व्ही विद्युतीकरण उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिली आहे, मात्र मंजुरीला पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही प्रशासनाकडून विद्युतीकरण उपकेंद्राचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वीज समस्येचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनातून नमूद केले आहे. सदरचे विद्युतीकरण उपकेंद्र मंजुरीनंतर जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे तृट्या दूर करण्याचे पत्रावरून उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांचे मार्फत तृट्यांची पुर्तता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आल्याचे निवेदनातून म्हटले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून ३३/११ के व्ही उपकेंद्राच्या निर्मितीला दिरंगाई केली जात असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे कसनसुर परिसरातील एकावन्न गावांच्या विद्युतीकरणाची समस्या लक्षात घेऊन मंजूर ३३/११ के व्ही विद्युत वितरण उपकेंद्राची निर्मिती त्वरित करण्याची मागणी ग्रामपंचायत कसनसुरच्या सरपंच कमल हेडो, कोटमीच्या सरपंच सिंधू मोहंदा, वाघेझरीचे सरपंच विलास कोंदामी, उपसरपंच देवीदास मट्टामी, महादेव पदा, वेनहारा गोटूल समिती अध्यक्ष सुधाकर गोटा, सचिव राजू गोमाडी, प्रकाश पुंगाटी, दशरथ पोटावी व नागरिकांनी जिल्हाधिकारी संजय दैनी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा समस्याग्रस्त नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.