नक्षल्यांकडून आणखी एका पोलीस खबरीची हत्या,

मृतदेहावर टाकलेल्या चिट्ठीत पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मीने घेतली जबाबदारी,

भामरागड;(गडचिरोली)
तालुक्यातील मिरगुडवंचा येथील लालू मालू दुर्वा, (४०वर्ष) या व्यक्तीची पोलीस खबरी असल्याचा संशयावरून हत्या केली आहे. सदरची हत्या तो पोलीस खबरी असल्यामुळे केल्याचे मृतदेहावर ठेवलेल्या हस्तलिखित चिट्ठीत नक्षल्यांच्या पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मी या संघटनेने केल्याचे नमूद केले आहे.

सदरची हत्या नक्षल्यांकडून २८ जुलै ते ०३ ऑगस्ट नक्षल चळवळीचा स्थापना दिन प्रित्यर्थ पाळला जाणाऱ्या शहीद सप्ताह दरम्यान घडल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. शहीद सप्ताह सुरू होण्यापूर्वी (ता.२५ जुलै) गेल्या गुरुवारी भामरागड तालुक्यातील आरेवाडा या गावातील जयराम कोमटी गावडे (३८वर्ष) या आत्मसमर्पिताची नक्षल्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली होती, जयराम गावडे यांचे सांडलेले रक्त सुकण्यापूर्वीच पाच दिवसांच्या फरकाने लालू दुर्वा यांची हत्या करून नक्षल्यांनी दहशत निर्माण केली आहे. लालू दुर्वा हे एका पोलिस कर्मचाऱ्यांचे नातेवाहिक असल्याचे बोलल्या जात आहे. नक्षल्यांनी त्यांची हत्या केल्याचे (ता. ३१ जुलै) बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले आहे.

लालू मालू दुर्वा यांची (ता. ३० जुलै) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या राहते घरी झोपलेले असतांना काही सशस्त्र नक्षली त्यांच्या घरी आले, त्या नक्षल्यांनी लालूची हत्या केली असून मृतदेहावर एक हस्तलिखित चिट्ठी ठेवण्यात आले आहे. चिट्ठीत लालू धुर्वा हा पोलिसांचा खबरी होता, त्याने अनेकदा नक्षल चळवळीच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिली आहे, एकदा त्याने दिलेल्या माहितीवरून आम्हाला आमचा कॅम्प खाली करून पळून जावे लागल्याचेही चिट्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे एरिया दलमने सभा घेऊन लालू याला तंबी देण्यात आली होती, त्यानंतर तो दोन वर्षे पोलिसांच्या मदतीने गावातून फरार होता, मात्र आमच्या दलमची त्याच्यावर पाळत होती, तो गावात परत आल्याने त्याची पीएलजीए (पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मी,) या नक्षल संघटनेने नागरिकांच्यावतीने हत्या केल्याचे नक्षल्यांनी मृतदेहावर ठेवलेल्या माडिया भाषेतील हस्तलिखित चिठ्ठीतून म्हटले आहे. शेवटी चिट्ठीत भामरागड एरिया कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे.

घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून घटनेचा पुढील तपास भामरागड पोलिसांकडून केला जात आहे. जिल्हा पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे.