लोहखनिजांच्या रक्षणासाठी जन आंदोनलनाची गरज!

अन्यथा तुम्हाला उखडून फेकले जाईल! सैनू गोटा यांनी व्यक्त केली भीती,

एटापल्ली;(गडचिरोली)
शासनाच्या आदिवासी विरुद्ध धोरणामुळे पेसा, वनाधिकार कायदा व आदिवासींच्या संरक्षित क्षेत्रातील खनिजांच्या साठ्यांची धनंदांडग्यांकडून लूट केली जात असून वेळीच जन आंदोलन उभारून खनिजाचे रक्षण केले नाही. तर आदिवासींना उखडून फेकून दिले जाण्याची भीती माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी जागतिक मूलनिवासी दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शनातून व्यक्त केली आहे.

शहीद विर बाबुराव शेडमके यांचा ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या लढ्याची पावन भूमी तथा जगविख्यात सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात आदिवासी पारंपरिक गोटूल समितीच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम प्रसंगी सैनू गोटा हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते, यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या भवितव्यावर तीव्र चिंता व्यक्त करतांना, शेकडो वर्षांपासून परकीय राजवटीतील वेगवेगळ्या आक्रमणकाऱ्यांच्या तावडीतून आदिवासी विर योद्धयांचा पराक्रम तसेच जन संघर्षाचा लढ्याच्या रेट्यातून सुरजागड व इतर लोहखनिज साठ्यांचे सुरक्षित जतन गेले होते. मात्र गेल्या सात ते आठ वर्षांत हीच मौल्यवान खनिज साठे शासनाकर्त्यांच्या संगनमताने धनदांडग्यांच्या घस्यात टाकली गेली आहेत, त्यामुळे स्थानिक आदिवासींचे जीवन कायमस्वरूपी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी सामान्य जनतेकडून दडपशाही झुंगारून लोकशाही मार्गाने एकत्र येऊन तीव्र आंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे, अन्यथा त्याच धनंदांडग्यांकडून भविष्यातील केवळ पाच ते दहा वर्षात या भागातील आदिवासींना उखडून फेकून दिले जाईल, अशी भीती सैनू गोटा यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी सरपंच अरुणा सडमेक, माजी पंचायत समिती सदस्य शिला गोटा, माजी सरपंच कल्पना आलाम, रमेश लेकामी, आशिष पुंगाटी, राकेश गोटा, सतीश हिचामी, रमेश कवडो, व भाकपचे सचिव सचिन मोतकुलवार आदी मान्यवरांनी आरोग्य, शिक्षण, पक्के रस्ते, नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकामे, पिण्याचे शुद्ध पाणी, रोजगार व मूलभूत सोईसुविधा अशा समस्यांवर विस्तारित मार्गदर्शन केले,

माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सुरजागड आदिवासी पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या सत्तर गावांचे अध्यक्ष सैनू गोटा यांनी मार्गदर्शनातुन एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरून मागील सात वर्षांपासून केले जात असलेले लोहखनिज उत्खनन, वाहतूक तसेच गडचिरोली जिल्ह्यातील इतर मंजूर व प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पांना त्यांचा विरोध कायम असल्याचे मत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सैनू गोटा यांनी या भागातील आदिवासी तथा पारंपरिक निवासी नागरिकांना लोहखनिज उत्खनन व वाहतुक विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्यास दिलेल्या हाकेला उपस्थित जनसामान्यांमधून टाळ्यांचा कडकडाट व महापुरुषांच्या जयघोषाने उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यामुळे गोटा यांनी नागरिकांच्या मनातील लोहखनिज उत्खनन विरोधातील खदखद हेरून आदिवासींचे जीवनमान उध्वस्त करणारे लोहखनिज उत्खनन, वाहतूक व त्यातून होणारे वनसंपदा, संसाधनांची हानीतुन होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी लढा उभारण्याचे केलेल्या आवाहनाने जनतेत नवे चैतन्य संचारण्यास मदत झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामसभा व आदिवासी नागरिकांकडून लोहखनिज उत्खनन व वाहतूक विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव दोरपेटी तर आभार प्रदर्शन मंगेश नरोटी यांनी व्यक्त केले, यावेळी सुरजागड पारंपरिक इलाका पट्टीतील सत्तर गावचे ग्रामसभा प्रतिनिधी, गायता, भूमिया, पाटील, व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.