चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली प्राथमिक उपचार केंद्राचा भोंगळ कारभार उघड

ग्रामीण भागात रुग्णांची हेळसांड

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – सध्यस्थितीत उष्णतेचा पारा भडकला आहे. अती उष्णतेमुळे गरीब सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची लाही लाही झाली आहे.

ग्रामीण भागात ताप हिवताप सर्दी, डोकेदुखी, असे आजार होत असून रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरच्या उपचारा शिवाय पर्याय नाही. अशी परिस्थिती असताना मुल तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या राजोली येथे नागरिकांना ताप व अनेक आजार झाले आहेत. यासाठी दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ८ -१५ वाजता रुग्णालयाच्या वेळेतच अनेक रुग्ण उपचारासाठी पी.एच.सी. रुग्णालयात गेले असता रुग्णालयात एक तास होऊनही एकही डॉक्टर किंवा असिस्टंट उपलब्ध नाही.

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण

थोड्या वेळाने येतील म्हणून वाट पाहता पाहता रुग्णांच्या संख्येत भर पडली तरी सुद्धा डॉक्टरांचा पत्ताच नाही. आलेले सर्व रुग्ण बिचारे थकून गेले. तरी उपचार होऊ शकला नाही. शेवटी उपचारासाठी गेलेल्या अनेक रुग्णांनी गावातील प्रमुख म्हणून सरपंच जितेंद्र लोणारे यांना रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगितल्याने तात्काळ सरपंच जितेंद्र लोणारे युवक कार्यकर्ते शाम पुट्टावार रुग्णालयात गेले असता अनेक पुरुष व महिला रुग्णांची उपचारासाठी रांग लागली होती.

रुग्ण थकून गेले होते. राजोली पी.एच.सी. रुग्णालयाची वेळ सकाळी ८ वाजता असताना सुद्धा सेवेत असणारे डॉ.कवाडे आणि डॉ.बनसोड मॅडम अनुपस्थित होते. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार होऊ शकला नाही. अशा वेळेस एखादा रुग्ण दगावला तर जबाबदार कोण.? तसेच रुग्णालयात बी.पी.च्या गोळ्या नाही.

अत्यावश्यक औषध उपलब्ध राहत नाही. त्यामुळे अनेक दिवसापासून अनेक आजाराच्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. जुन्याच रुग्णालयाची अशी अवस्था आहे.

आतातर रुग्णालयाची नवीन इमारत लोकार्पण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तेव्हा राजोली गावातील व परिसरातील रुग्णांची संख्या लक्षात घेता अत्यावश्यक औषधी आणि नियमित उपचार करणारे डॉक्टर ,नर्स,व इतर सेवा देणारे कर्मचारी शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे व रुग्णांना आरोग्य सेवा पुरवावी अन्यथा ग्रामस्थांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच जितेंद्र लोणारे, व त्यांचे सोबत असणाऱ्या पदाधिकारी यांनी दिला आहे.