एटापल्ली नगरपंचायत हक्काचा कारभारी मिळण्याच्या प्रतीक्षेत!

शासनाचे शहरी विकास ध्येय, भकास होण्याच्या मार्गावर?

एटापल्ली;(गडचिरोली)
येथील नगरपंचायतचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांवरही दोन ठिकाणच्या कामांचा बोजा पडत असून प्रशासकीय कामकाजातील अनियमिततेमुळे शासनाचे विकसनशील शहराचे ध्येय भकास होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

नगरपंचायत निर्मितीच्या नऊ वर्षात अकरा महिन्यांचा अपवाद वगळता मुख्याधिकारी पदी प्रभारी अधिकाऱ्यांनीच कारभार सांभाळला आहे, त्यामुळे शहराचा विकास खूंटला असून पूर्णवेळ मुख्याधिकारीचे नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे.
नगरपंचायतला निरंतर प्रभारी मुख्याधिकारी राहत असल्याने शहराच्या विकास कामांना ब्रेक लागला असून नागरिकांना घरकुल, सौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्याला हानिकारक नाली सफाई, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना शासन स्तरावरील लाभाच्या योजना, शैक्षणिक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

तालुका मुख्यालयाचा विकास गतिमान होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून में २०१५ साली एटापल्ली ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र विकासाला गती देणारे मुख्याधिकारी पद कायम रिक्त राहत असल्यामुळे शहराची अधोगती होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. शहर अविकसित, मागास, नक्षल प्रभावी व आदिवासी बहुल असून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे, नगरपंचायतला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शासनाच्या घरकुल, शौचालय, अंतर्गत रस्ते, व नाली बांधकामे रखड़लेली असून, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य, व शिक्षणाच्या समस्याही गंभीर होत आहेत.

शासनाने एटापल्ली ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा दिल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये शहरी सोयी सुविधा मिळण्याच्या आशा पल्वीत झाल्या होत्या, मात्र नऊ वर्षाच्या कालखंडात केवळ अकरा महिन्यात पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून सुशील कोकणी चार महिने व अजय साळवे सात महिने असे अकरा महिने कारभार सांभाळनारे दोन पूर्णवेळ मुख्याधिकारी वगळता सुरवातीपासूनच तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अशा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे, महसूल विभागातील अधिकाऱ्यांना नागरी विकास योजना राबविण्याचा फारसा अनुभव व पुरेशी माहिती नसल्याने, विकास कामाचे नियोजन करण्यास त्यांना बऱ्याच अडचणी सामना करावा लागतो, त्यामुळे विकासाच्या प्रतिक्षेतील शहर भकास होतांना दिसून येत आहे, सध्या नायब तहसीलदार प्रवीण चौधरी यांचेकडे प्रभार आहे. चौधरी यांना मूळ अस्थापणा नायब तहसीलदार पदाची कामे सांभाळून नगरपंचयातचा प्रभार सांभाळावा लागत आहे, त्यांनी एक वर्षापूर्वी एटापल्ली नगरपंचायतचा प्रभार स्वीकारल्यानंतर वर्षभरात केवळ सहा ते सात मासिक सभेला हजेरी लावता आली, यावेळात त्यांना सभेच्या विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यासही वेळ देता येणे शक्य होत नाही, हे मात्र विशेष!

सदर प्रभारी अधिकारी प्रवीण चौधरी त्यांचेकडे मुळ आस्थापणेची भरपूर कामे असल्यामुळे त्यांना नगरपंचायत प्रशासनाकड़े लक्ष्य देण्यास फारसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे तालुका मुख्यालयाचा खुंटलेला शहरीकरणीय विकास गतिमान करण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची नेमनुक होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भकास झालेल्या एटापल्ली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी नगरपंचयातच्या मुख्याधिकाऱ्याचे रिक्त पद त्वरित भरण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.