गडचिरोली;
बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली आहे. नरड यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप ठेवण्यात आहे.
पोलिसांनी उल्हास नरड यांना अटक करून मध्यरात्री बारा वाजता दरम्यान नागपुरला रवानगी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी दिलेल्या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा. जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा कोणताही अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली होती. या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरह यांना ताब्यात घेतले आहे.
प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात शिक्षण विभागातील आणखी काही अधिकारी आरोपी म्हणून अटक केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.