चंद्रपुरात हज यात्रेकरुंसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नवं हज धोरण काय आहे?

News34 chandrapur

चंद्रपूर : सन 2023 मध्ये हज यात्रेसाठी Hajj journey जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, 65 वर्षांवरील व्यक्तींना सीझनल इनफ्लूएंझा लस देण्यात येणार आहे. तरी सर्व हज यात्रेकरूंनी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या एन.सी.डी. ओपीडी येथे शिबीराचे दिवशी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे  यांनी केले आहे. Medical camp

काय आहे नवं हज धोरण?

नवीन हज धोरणानुसार यावेळी वृद्ध, अपंग आणि महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. एवढेच नाही तर 45 वर्षांवरील कोणतीही महिला आता एकट्याने हज प्रवास करण्यासाठी अर्ज करू शकणार आहे. केंद्र सरकारनं यावर्षी केलेल्या करारानुसार यंदा देशभरातून 1 लाख 75 हजार 25 जणांना हज यात्रा करता येणार आहे. यापैकी 80 टक्के हाजी हज कमिटीच्या वतीने यात्रेला जाणार आहेत. तर 20 टक्के हाजी खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून हज यात्रेला जाऊ शकतील. त्याचबरोबर केंद्र सरकारनं यावर्षी व्हीआयपी कोटाही रद्द केला असून व्हीआयपी नागरिकांनाही सामान्य यात्रेकरुंप्रमाणे प्रवास करावा लागणार आहे. Hajj policy 2023

हज ला जाताना सोबत कोणती कागदपत्रे हवी?

हज यात्रेसाठी किमान सहा महिने कालावधीचा वैध पासपोर्ट आवश्यक आहे. त्यामधील दोन पेज रिकामी हवीत. आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक असून यावर्षी कोव्हिड लसीकरणाचे प्रमाणपत्रही सौदी अरेबिया सरकारनं मागितलं आहे.

हज यात्रेला एकूण किती खर्च येतो?

हज कमिटीकडून आयोजित करण्यात आलेली यात्रा ही 40 दिवसांची असते. तर खासगी टूर्सकडून तुम्हाला अनेक ऑप्शन आहेत. यामध्ये 13, 21, 25, 35 आणि 40 दिवसांचे पॅकेज आहेत. या यात्रेसाठी हज कमिटी ऑफ इंडियाकडून किमान  3 लाख 80 हजार ते 4 लाख इतका खर्च येईल. हे सर्व पैसे हप्त्यानं देण्याची सोय आहे. भारतामधून यात्रेसाठी विमानात बसण्यापूर्वी पूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे.