समस्येचा On The Spot निपटारा

कामे करण्याचा धडाका

News34 chandrapur

चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षण मतदारसंघातून निवडून आल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी “समस्या तुमचा पुढाकार आमचा” हा धडाकेबाज उपक्रम हाती घेतलेला आहे. या माध्यमातून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पार पडलेल्या तक्रार निवारण सभेत शिक्षण विभागातील समस्या सोडवण्यासाठी तब्बल आठ तास मॅरेथॉन सभा पार पडली. या सभेत अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे ऑन द स्पॉट निकाली काढण्यात आली व लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले.

 

दुपारी एक वाजता सुरू झालेल्या सभेचे समारोप रात्री ९.०० वाजता झाला. यात प्राथमिक व माध्यमिक विभागातील प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक आयोजित केलेली आहे. यात नियमानुसार प्रलंबित समस्या निकाली काढण्याच्या सूचना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 

या सभेत एकूण प्राथमिक व माध्यमिक विभागातील २५ सामुहिक प्रकरणे प्रलंबित होती तर ६० पेक्षा अधिक वैयक्तिक स्वरूपाच्या प्रकरणांचा निपटारा ‘ऑन द स्पॉट’ अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे दुपारी एक वाजता सुरू झालेली सभा रात्री नऊ वाजता संपली. प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमदारांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सभागृह खचाखच भरलेला असताना आमदारांनी आपल्या ओजस्वी शब्दांनी व तेजस्वी नेतृत्वाने शिक्षण विभागातील सुस्त अधिकाऱ्यांची झोप उडविली.

प्रलंबित समस्यांचे स्पष्टीकरण देताना शिक्षण अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. या माध्यमातून शिक्षण विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. सर्वसामान्य पीडित कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी उठवलेला आवाज सर्वांना दिलासा देणारा होता. इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या समस्या आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.याचा प्रत्यक्ष अनुभव सभागृहातील बसलेल्या प्रत्येकाने घेतला. कणखर नेतृत्वामुळे आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्याची प्रशंसा झाली.

सभेच्या शेवटी ‘ऑन द स्पॉट ‘अनुकंपा तत्त्वावरील प्रकरण निकाली काढण्याचे आदेश  शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिले आणि दिनांक २४ मे २०२३ रोजी रात्रोला अनुकंपा तत्त्वावरील पाचही प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. यात प्रथम प्रकाश बडोले,अर्चना बंडू येरमलवार, सचिन शिवरकर, अनमोल पेटकर यांचे मंजुरी पत्र तेव्हाच आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. तर देवता दादाजी सुकारे यांचे प्रकरण त्रुटी पूर्तता केल्यानंतर तात्काळ देण्याचे मान्य केले.

शिवाय उर्वरित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला एक महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. आमदार अडबाले यांचे पुढाकारातून राबविण्यात आलेला उपक्रम प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिलासा देऊन गेला तर शिक्षण विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांना धडा शिकवणारा ठरला. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा घेतलेला क्लास व अधिकाऱ्यांची उडालेली भंबेरी हा शिक्षण विभागात चांगलाच चर्चेचा विषय आहे.