तर आमदार वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात आंदोलन करणार

रस्त्यांची दुरावस्था

News34

ब्रह्मपुरी/ गांगलवाडी: अलीकडेच कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत कॅन्सर आजाराची तपासणी करणारे महाराष्ट्रातील एकमेव सुसज्ज असे फिरते वाहन सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी वर्षासाठी किमान तीनशे रुग्णांचे प्राण वाचवून “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” हेच आपलं जीवनाचं ब्रीद असल्याची प्रचिती देणारे वाहन लोकार्पित करून लोकांची मने जिंकत आहे.

 

तर दुसरीकडे मात्र गांगलवाडी ते मुडझा जाणारा एकमेव मार्ग की ज्या मार्गाने दिवसभरात अनेक विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिक, व्यापारी तसेच शासकीय वाहने यांच्या माध्यमातून फार मोठे प्रमाणावर ये जा करणाऱ्यांची वर्दळ असते.

 

परंतु याच रस्त्यावरून नदी काठावरून होणारी रेती तस्करी व अवैध वाहतूक यामुळे रस्त्याची पूर्णपणे वताहत झालेली असून अपघाताच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक लोकांचे जीव जाऊन त्यांचे संसार रस्त्यावर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या मार्गाला असल्यामुळे काही दिवसापूर्वीच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांनी तेथील लोकांच्या भावना लक्षात घेऊन आरमोरी गांगलवाडी टी पॉइंट वरती फार मोठे जनआंदोलन उभे करून चक्काजाम करून रस्त्याच्या दुरुस्तीबाबतचे शासनाचे व स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

 

ही बाब लक्षात घेऊन या रस्त्याच्या दुरुस्ती करिता तात्पुरत्या स्वरूपात साधारणता 50 लाख रुपयाचे कंत्राट श्री वैद्य यांना प्राप्त झाल्याचे वृत्त चर्चिल्या जात आहे. मात्र हे काम सुरू असून कामादरम्यान कॉ. विनोद झोडगे यांनी नागरिकांसमवेत पाहणी केली असता रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये काँक्रीट व मुरमाचा वापर न करता रेतीचा वापर करून रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

यामुळे या रस्त्यावरून जाणारी येणारी वाहने या वाळू व रेती मध्ये फसून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे, तेव्हा येत्या पंधरा दिवसांमध्ये शासनाने निर्गमित केलेल्या इस्टिमेट व वर्क ऑर्डर नुसार रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर आम्ही खड्ड्यात झोपू आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे.

यावेळी विनोद पाटील, पदमाकर रामटेके,दादा आषटेकर, ज्ञानेश्र्वर डोंगरवार पंकज फुकटे,प्रकाश टेंभूरणे, अभिमन बावणे, खुशाल नागपूरे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.