आयएएस शुभम गुप्तांनी डुक्करांच्या योजनेतील मलींदाही चघळला?

लाभार्थ्यांच्या खात्यातून रक्कम वळविल्याचा लाभार्थी महिलेचा आरोप!

गडचिरोली;
आदिवासींच्या दुधाळ गायी वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांचा आणखी एक कारनामा उजेडात आला आहे. वराह (डुक्कर) वाटप योजनेतही त्यांनी बैंक खात्यातून पैसे वळती केल्याचा गंभीर आरोप लाभार्थी महिलेने केला आहे. सदर महिलेच्या आरोपाचा व्हिडीओ (ता.१८ ऑगस्ट) रविवारी समोर आला असून वराह वाटप योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना एटापल्लीत उपविभागीय अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी व भामरागडच्या आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून प्रभारी होते. त्यांनी गायी-डुक्कर योजनासह आदिवासी नागरिकांना मिळणाऱ्या लाभाच्या योजनांमधील मलींदा चघळून भ्रष्टाचाराने पालापाचोळा केल्याचे बोलल्या जात आहे.

गुप्ता यांनी शासन निर्णयाला बगल देत दुधाळ गाय वाटप योजनेत खर्चाची मर्यादा ५० हजार रुपये असतांना मर्यादा दुप्पट वाढविली होती. त्यांनी पदाचा दुरूपयोग करून दोन दुधाळ गायींच्या खरेदीसाठी प्रतिलाभार्थी १ लाख रुपये मंजूर दिली होती. सदरच्या वाढीव खर्च मंजुरीला लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप असतांनाही शुभम गुप्ता यांनी धमकावत ही खर्च मर्यादा दुप्पट करायला लावली, असे चौकशी अहवालात नमूद आहे. ५०७ पानांच्या या चौकशी अहवालासोबत व्हिडीओ जबाबही नोंदविल्यात आले आहेत. २० पैकी १९ लाभार्थ्यांचे जबाब नोंदविले असून पैसे कोणाच्या खात्यात वळविले त्या अहेरीतील दोन एजंटांचे बैंक स्टेटमेंटसुद्धा अहवालात जोडले आहेत.

दुधाळ गायी वाटप प्रकरणातील गैरव्यवहाराची अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी चौकशी करून अहवाल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविला असून त्यात आयएएस शुभम गुप्ता यांना दोषी असल्याचे नमूद आहे. दरम्यान, वराह पालन योजनेतही लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्यांच्या खात्यात वळविल्याचा आरोपाचा एक व्हिडीओ समोर आला असून भामरागड येथील यशोदा देऊ पुंगाटी ही आदिवासी महिला आपली कैफियत सांगतांना दिसून येत आहे. ‘वराह (डुक्कर) वाटप योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमच्याकडून अर्ज भरून घेऊन आम्हाला वराह मिळवून दिलेच नाही. असे ही महिला व्हिडिओतून सांगत आहे. तसेच तिने कार्यालयात जाऊन विचारणा केल्यावर दारापुढे मेलेले वराह आणून टाकले होते. नंतर माझ्या खात्यात २५ हजार रुपये वराह खरेदीसाठी व विम्याचे १० हजार रुपये टाकण्यात आले, त्यानंतर कर्मचाऱ्यांना पाठवून धमकावत ३५ हजार रुपये दुसऱ्या बँक खात्यात वळविले’, असा आरोप त्या महिलेने केला आहे. त्यामुळे गुप्ता यांच्या कार्यकाळातील सर्वच योजनांबाबत संशय निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेत सहभागी व सत्तेवर छाप असलेले, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढारी व नेत्यावर शुभम गुप्ताची दहशत कायम आहे? असा प्रश्न यानिमित्याने नागरिकांमधून विचाराला जात आहे.

गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून लोकसभेसह तिन्ही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. एकीकडे अतिदुर्गम भामरागड सारख्या ठिकाणी आदिवासी योजनांच्या नावाखाली आयएएस अधिकाऱ्याकडून शोषण झाल्याचे प्रकरण उजेडात आले असताना जिल्ह्यातील एकही नेता याबाबत ब्र शब्द काढतांना दिसून येत नाही. शुभम गुप्ता जिल्ह्यात कार्यरत असतांना त्यांच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या बहुतेक राजकीय पक्ष पुढारी, कंत्राटदार व सामान्य नागरिकांना धमकावून ते आपल्या धाकात ठेवत होते, त्यामुळे हे राजकीय पुढारी व आदिवासी नेते, आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर बेंबीच्या देठापासून ओरडून कठोर कारवाहीची मागणी करतांना दिसून येतात. मात्र शुभम गुप्ता यांच्या गैरकारभारावर गप्प असल्याचे दिसून येते. संपूर्ण जिल्ह्यातून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी हेच गुप्तांसाठी कर्दनकाळ ठरले असून त्यांच्याच तक्रारीची दखल घेऊन राज्य शासनाने गुप्तांच्या गायी वाटप घोटाळ्याची चौकशी केली आहे. यातुन गुप्ताच्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटले आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अशासकीय सदस्य म्हणून लाभ वाटप समितीवर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील एक अशासकीय सदस्य समितीत असतो. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात नियुक्त सदस्यांनी हा सगळा गैरव्यवहार होत असताना शुभम गुप्ता यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप का घेतला नाही. हेही अधोरेखित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील अनेकांचे हात आयएएस शुभम गुप्त्यांच्या काळ्या कारनाम्यात गुंतले? असल्याची शंका नागरिकांमधून घेतली जात आहे. एक वर्षांपूर्वी शुभम गुप्ता यांनी सांभाळलेल्या उपविभागीय अधिकारी एटापल्ली, नगरपंचायत मुख्याधिकारी एटापल्ली व प्रकल्प अधिकारी भामरागड अशा सर्वच विभागातील कारभाराच्या चौकशीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.