चंद्रपूरात मद्य विक्रेते करीत आहे नियमांची ऐशीतैशी

चंद्रपुरात नियमांची ऐसीतैसी

News34 chandrapur

चंद्रपूर : राज्य शासनाने परवाने मंजूर करताना दारू दुकानांसाठी नियमावली निर्धारित करून दिली आहे. परंतु, शहरातील अनेक दारू दुकानदारांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. मात्र, राज्य उत्पादन शूल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी केवळ अर्थपूर्ण मैत्री जपण्यात धन्यता मानताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारू दुकानांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. Chandrapur liquor association

दारूविक्रेत्यांनी जिल्ह्यातील बंदी उठविल्यानंतर पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. परंतु, अनेक दारू दुकानदार शासकीय नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. देशी दारू, वाईन शाप, बिअर शापी अणि बिअर बार हे निर्धारित वेळेआधीच सुरू केले जात आहेत. तर, रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. अनेक बिअर शापी मालकांनी ग्राहकांना दारू पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून दिली आहे. Chandrapur congress news

वाईन शापजवळील हातठेल्यांवर खुलेआमपणे मद्य प्राशन करू दिले जात आहे. तर, परमीट रूममध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांना प्रवेश नाही, असे एकाही बारमध्ये फलक लावण्यात आलेले नाही. अनेक दारू दुकानांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, याचा त्रास चंद्रपूरकरांना सहन करावा लागत आहे.

मात्र, दारू दुकानदारांचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. परंतु, राज्य उत्पादन शूल्क विभागाने शहरात एकही कारवाई केलेली नाही. दारूविक्रेते आणि अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण मैत्री ही कारवाईत आड येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एवढेच नाही, तर जिल्हा न्यायदंडाधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. चंद्रपूर लिकर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दारूविक्रेत्यांनी आपली दुकाने दिवसभर सुरू ठेवली.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारू दुकानांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यांसदर्भातील निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना सुद्धा सादर करण्यात आले आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह प्रविण पडवेकर, अश्विनी खोब्रागडे, सुभाष जुनघरे, कुणाल चहारे, नौशाद शेख यांचा समावेश होता.