News34 chandrapur
चंद्रपूर : जगात जन्माला येणार प्रत्येकजण हा सर्वप्रथम मानव असतो. त्यानंतर तो आपापल्या धर्माचे आचरण करू लागतो. या देशातील हिंदू, मुस्लिम हे दोन्ही धर्म समान आहेत. हिंदूंनी स्वप्न बघितली, तर मुस्लिमांनी ख्वाब बघितले. दोघांचेही ध्येय हे एकच होते. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडविले. त्यात हिंदू-मुस्लिम समाजाचा समान वाटा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले. Chandrapur eid Milan
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून शुक्रवार, २८ एप्रिलला घुटकाळा वॉर्डातील नेहरू शाळेत आयोजित ईद मिलन समारोह कार्यक्रमात आमदार वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, रमजान हा पवित्र महिना समजला जातो. एकमेकांची गळा भेट घेत सर्व मनभेद, मतभेद दूर सारून नवीन जिवनाला सुरवात करणारा हा महिना आहे. देशात हिंदू-मुस्लिम हे पूर्वीपासूनच एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी होत होते. मात्र, मागील काही वर्षात देशात वेगळीच स्थिती निर्माण केली जात आहे. ईदच्या दिवशी नमाज पठण करू नये यासाठी कलम १४४ लावले जाते. नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. ही देशासाठी शरमेची बाब आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशाला गुलामगिरीकडे नेण्याचे काम केले जात आहे. याविरोधात दिवाळीला मिठाई आणि ईदला शिरखुर्मा देत सर्वांनी पुन्हा एकत्र यावे. Congress chandrapur
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी, देशातील सर्व जात, धर्म, पंथातील नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या धर्मानुसार सण साजरे करीत असतात. सर्वधर्मसमभावातून सर्व जातीतील लोक एकमेकांच्या सण, उत्सवात सहभागी होतात, हीच खरी शिकवण असल्याचे सांगितले. तर, आमदार अभिजित वंजारी यांनी सध्या देशात धर्म, जात, संप्रदायात मतभेद निर्माण करून वातावरण दुषित करण्याचे काम सुरू असल्याच्या देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी, ईद मिलन समारोह कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी मुस्लिम बांधवांकडून जिल्हाध्यक्ष तिवारी यांना श्री गणेशाची मूर्ती भेट देण्यात आली. कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शफिक अहमद, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, जामा मजिदचे अध्यक्ष सलिम बेग, हबीब मेनन, युसूफ चाचा, ताजुद्दीन शेख, बलवीर सिंग गुरम, रवींदरसिंग सलुजा यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग यांच्यासह अन्य विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.