चंद्रपूरच्या या युवकाचा अभिनव उपक्रम, झाडांना थेट सलाईनद्वारे पाणी

वाढदिवसाला अनोखी शक्कल

News34 chandrapur

 

राजुरा : वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस, सध्याच्या युगात वाढदिव साजरा करण्याची जणूकाही स्पर्धाच सुरू झाली आहे. श्रीमंतापासून तर गरिबांपर्यंत सर्वच लोक वाढदिवसानिमित्त नको तो खर्च करीत असतो.

काही डिजे लावून तर काही आलिशान हॉटेलमध्ये मित्रमंडळीसह पार्टी करणे, तर काही लोक वाढदिवसाला मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप देऊन मोठ्या थाटामाटात आयोजन करीत असते, मात्र रामपूर येथील पानठेला चालक प्रमोद पानघाटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता अनोखी शक्कल लढवित दवाखान्यातून सलाईनच्या रिकाम्या बॉटल जमा करून त्यात पाणी घालून लहान झाडांना संजीवनी देण्याचा व मोठ्या झाडांवर जलपात्र लावून पशू पक्षांना पाणी पुरविण्याची अनोखी शक्कल लढविली आहे.

 

राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे पसरले आहे. कोळसा खाणीमुळे जमिनीमधील पाण्याची पातळी खालावली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. याचा परिणाम मानव जिवांप्रमानेच पशुपक्षी व झाडांवर दिसून येत आहे. यावर छोटासा उपाय म्हणून प्रमोद पानघाटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रामपूर येथील येरणे ले-आऊट मधील लहान झाडांकरिता डॉ. रितेश ठाकरे यांच्या दवाखान्यातून रिकाम्या सलाईन बॉटल आणून त्यामध्ये पाणी भरून त्याद्वारे झाडांना पाणी देण्याचा व घराजवळील मोठ्या झाडांवर पशू पक्षांकरीता जलपात्र लावित इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

जमिनीतील खालावलेली पाण्याची पातळी व वातावरणातील उष्णता यामुळे लहान झाडे पाण्याअभावी सुकून जात आहे. अशावेळी झाडाजवळ ओलावा टिकून रहावा म्हणून ठिंबक सिंचनाप्रमाने थेंब थेंब पाणी झाडाजवळ पोहचविण्यासाठी दवाखान्यात सलाईन लावल्यानंतर रिकाम्या झालेल्या सलाईनच्या बॉटल जमा करून त्यात पाणी घालून झाडांना संजीवनी देण्याचे काम सुरू केले आहे.

तर सिमेंटच्या जंगलात पशू पक्षांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत असून काही पशूपक्षी पाण्याअभावी मृत पावत आहे. त्यांना वाचविण्यासाठी पाण्याची सोय म्हणून झाडांवर घराच्या खिडकीजवळ पाणी भरलेले जलपात्र लावून वाढदिवस साजरा केला आहे. यामुळे अनेकांनी प्रमोद पानघाटे यांचे कौतुक केले आहे.