भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,
गडचिरोली;
जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतमध्ये विकास कामे करतांना नियमबाह्य व अवैध पध्दतीने निविदा मंजूर करून मनमानी कारभार केला जात असल्याने शहराचा विकास खुंटला असून विशिष्ठ क्षेत्रातच कोट्यावधीचा निधी गेली दोन वर्षांत खर्ची केला गेल्याने नियमबाह्य कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाहीची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अहेरी नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे करतांना अवैध प्रकारे निविदा प्रक्रीया राबविली जात असल्याच्या तक्रारी कंत्राटदार संघटना व विविध संस्थांनी केल्या आहेत. तक्रारीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने अनेकदा सुधारणा सुचवून अवैध निविदा प्रक्रीया रद्द केल्या असल्याचे वाघरे यांनी निवेदनातून म्हटले आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन वारंवार शासकिय नियमांना व मार्गदर्शक तत्वांना डावलून मनमानी पध्दतीने मर्जीतल्या कंत्राटदारांच्या हितासाठी नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप निवेदनातून केले आहे.
त्यामुळे अहेरी नगरपंचायतच्या बेकायदेशीर ठराव घेऊन झालेल्या बेकायदा विकास कामांची गंभीर दखल घेऊन करदात्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमबाह्य विकास कामांची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना नगरपंचायत गटनेत्या तथा भाजप महिला मोर्चा जिल्हा महामंत्री शालिनीताई पोहनेकर, भाजपा शहराध्यक्ष, नगरसेवक मुकेश नामेवार, तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक विकास उईक, संजय पोहनेकर, भास्कर बुरे प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)