विद्यार्थी, नवयुवकांच्या अकाली जाण्याने पालकांमध्ये धास्ती!
गडचिरोली;
जिल्ह्यात नवयुवक, विद्यार्थी व मद्यपी नागरिकांचे भवितव्य अवैध दारू व्यवसाय, व्यसनाधिनता आणि खराब खड्डेमय रस्त्यावर वाहन दुर्घटनेतील मृत्यू अशा नव्या समस्येच्या विळख्यात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अशुद्ध, अवैध दारू व्यसनाधिनता व रस्ता वाहन दुर्घटनेत विद्यार्थी, नवयुवकांचे अकाली निधनाने पालकवर्ग धास्तावला असून निष्पाप पाल्यांचा नाहक जाणारा बळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अवैध दारू विक्री विरुद्ध कठोर कारवाही रस्ता बांधकाम व निर्मितीची मागणी पालक, नागरिकांकडून केली जात आहे.
आदिवासी बहुल, दुर्गम, अतिमागास व अविकसित भाग म्हणून जगात गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे, त्यामुळे येथील आदिवासी, गोरगरीब, दारिद्र्यातील नागरिक दारूचे व्यसन लागू नये, या भागाचा मागासलेपणा दूर होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावावे दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य शासनाने चार दशकांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदी लागू केली आहे, मात्र वैधरीत्या कागदावर बंदीच्या यादीत येत असलेली दारू अवैधरीत्या मात्र लगतच्या तेलंगाणा, छत्तीसगड राज्यासह चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून तस्करी करून विकली जाणे थांबलेली कधी दिसले नाही, जिल्ह्यात दारू माफियांचे फार मोठे रॅकेट आहे, त्यामुळे तस्करांकडून दारू विक्री व्यवसायासाठी विद्यार्थी व नवयुवकांच्या वापर केला जाण्याची बाब लपून राहत नाही, अशातच विद्यार्थी, नवतरुणाईला दारूचा व्यवसाय व व्यसनाचे आकर्षण निर्माण झाल्याचे दिसुत येत आहे, गेल्या वर्षभरात जिल्ह्यत महिन्याकाठी पंधरा ते वीस ठिकाणी रस्ता अपघाताच्या घटना घडल्याची नोंद शासन दरबारी केल्या गेली आहे, अपघातांमध्ये गंभीर जखमी होऊन दिव्यांगत्व येणारे व नाहक जीव गमवावे लागणाऱ्या व्यक्तीच्या संख्येत शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व नवयुवकांची संख्या सर्वाअधिक असल्याचे आढळून येते, तसेच विविध प्रकारच्या आजाराने मृत्यू ओढवणाऱ्या मयतांमध्येही दारूच्या आहारी जाऊन मृत्यू पावणारे व्यक्ती आहेत, त्यातही साठ ते सत्तर टक्के युवक व विद्यार्थी बळी ठरले आहेत. गेल्या चार दिवसात विविध ठिकाणीच्या रस्ता दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी, एक युवा वनरक्षक व एक अल्पवयीन विद्यार्थी जागीच ठार झालेच्या घटना घडल्या आहेत.
अशुद्ध, अवैध दारूची व्यसनाधिनता व दरडोई होणाऱ्या खराब रस्त्यावरील अपघात मृत्यू तांडावच्या ग्रहनाने नवयुवक, विद्यार्थी बळी ठरत असल्यामुळे पालकवर्ग व नागरिक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे फोफावलेला अशुद्ध दारूचा अवैध व्यवसाय व त्यातून होणाऱ्या रस्ता अपघातात सामन्यांचे निष्पाप बळी रोखण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ पातळीवरून अवैध दारू विरुद्ध कठोर कारवाही तसेच खराब रस्ता दुरुस्तीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.