आणखी दोन महिला नक्षल्यांचे आत्मसमर्पण,

पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा, नक्षली चळवळ खिळखिळी?

गडचिरोली;
जिल्हा पोलिसांच्या कर्तबगारीत आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला असून दक्षिण दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गिरीधर व दलम कमांडो त्याची पत्नी संगिता या दाम्पत्यांच्या आत्मसमर्पणानंतर एक आठवड्यातच बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरिना नरोटे (२८ वर्ष) रा.झारेवाडा, ता.एटापल्ली व शशिकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके (२९ वर्षे) रा.कटेझरी ता.धानोरा या दोन महिला नक्षल्यांनी पोलिसांपुढेआत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे पोलिस कामगिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून नक्षल चळवळ खिळखिळी करण्यात पोलिस यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.

राज्य शासनाने बाली व चंद्रकला या दोघींवर राज्य शासनाने प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बाली ही २०१० मध्ये, तर शशिकला ही २०११ साली नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने त्या दोघींनाही शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयेचे सानुग्रह निधी दिला जाणार आहे.

सन २०१० मध्ये गट्टा दलममध्ये सामील झाली होती. त्यानंतर अहेरी दलम. सन २०१६ मध्ये कंपनी क्र.१० मध्ये तिची बदली झाली. सन २०२१ मध्ये पीपीसीएम, एसीएम अर्थात प्लाटून पार्टी कमिटी सदस्य, एरीया कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाल्यावर आजपर्यंत त्या पदावर कार्यरत होती. या कार्यकाळात तिच्यावर एकूण २१ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दहा चकमकीत, एक जाळपोळ, एक अपहरण व नऊ इतर गुन्ह्यात ती सहभागी झाली होती,

तर शशिकला सन २०११ मध्ये टिपागड दलममध्ये सामील झाली त्यानंतर सन २०१३ मध्ये कंपनी क्र.४ मध्ये, सन २०२१ मध्ये कंपनी क्र १० मध्ये, सन २०२३ मध्ये पीपीसीएम, एसीएम अर्थात प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, एरीया कमिटी सदस्य, म्हणून कार्यरत होती. तिच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. सहा चकमकी व दोन इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

भरकटलेल्या माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात येऊन सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासन व जिल्हा पोलिसांच्या प्रयत्नाने गेले दोन वर्षात तब्बल १९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांचे आत्मसमर्पण घडवून आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलनिरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मार्गदर्शनात स्थानिक पोलीस कर्तव्य बजावत आहेत.

यावेळी नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक, भौतिक, पायाभूत विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर कठोर कारवाही करण्यास जिल्हा पोलीस सक्षम आहेत. त्यामुळे शस्त्र खाली टाकून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास ईच्छुकांना लोकशाही मार्गाने सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी मदत केली जात असून, नक्षल्यांनी हिंसेच्या मार्गाचा त्याग करुन शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समक्ष केले आहे.