समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूचे तांडव!
देऊळगाव राजा; (जिल्हा बुलढाणा)
जिल्ह्यातील कडवंची पेट्रोल पंप परीसरात स्विफ्ट डिझायर व इनोव्हा कारच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत सहा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान असे सात व्यक्ती ठार तर चार गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नागपूर ते मुबई समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघातातून मृत्यू तांडवाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
सदरची घटना शुक्रवारी (ता.२८) मध्यरात्रीनंतर घडली असून अपघातातील तीन मृतक मुंबईचे तर चार युवक बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्याचे आहेत.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील जालना शहरालगत असलेल्या कडवंची येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी स्विफ्ट डिझायर कार थांबली होती. इंधन भरून स्विफ्ट डिझायर कार नागपूरच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून विरुद्ध दिशेने प्रवेश करत होती, याच दरम्यान समोरून येणाऱ्या इनोव्हा कारने स्विफ्ट डिझायर कारला जोराची धडक दिली. त्यामुळे कार चक्क समृद्धी महामार्गाच्या खाली जाऊन कोसळली सदरच्या भीषण अपघातात फयाज शकील मंसुरी, फैजल शकील मंसूरी, अलताफ मंसूरी सर्व रा. मालाड मुंबई, व प्रदीप लक्ष्मण मिसाळ रा. पिंपळगाव, (बुज) देऊळगाव राजा, संदीप माणिक बुधवंत, विलास सुभाष कायंदे दोघेही रा.उंबरखेड, देऊळगाव राजा व अनिकेत चव्हाण हा सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा असे मयतांची नावे आहेत. शकील मंसूरी, अल्तमश मंसूरी, राजेश कुमार व अन्य एक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
समृद्धी महामार्ग प्रादेशिक विभाग पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून सातही जणांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून अंत्यविधीसाठी नातेवाहिकांना सुपूर्द केले जाणार आहे, पुढील तपास समृद्धी महामार्ग पोलिसांकडून केला जात आहे.