जिल्ह्यात पावसाचा कहर, दक्षिण गडचिरोलीचे मार्ग बंद,

सिरोंचा तालुक्यात खबरदारी, ११२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले,

गडचिरोली;
जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला असल्यामुळे नद्या व नाल्यांना पूर आला असून, दोन प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ११२ नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या २४ तासांसाठी याभागात रेड अलर्ट जारी केला आहे.

दोन दिवसांपासून भामरागड व सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. भामरागड तालुक्यातील कुडकेली नाल्याला पूर आल्याने तेथील रपटा वाहून गेला. यामुळे आलापल्ली ते भामरागड मार्ग बंद आहे. बेजूरपल्ली नाल्याला पूर आल्याने आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरीलाही वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

एटापल्ली तालुक्यातील बांडिया नदीला आलेल्या पुरामुळे एटापल्ली ते गट्टा मार्गावरील आलदंडी पुलावरून प्रवास करणे धोकादायक आहे, एटापल्ली नजीकच्या झुरी नाल्याला पूर आल्याने चोखेवाडा ते एटापल्ली व आलापल्ली हे मार्ग सकाळी बंद होते. मात्र दुपारपासून मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

काल रात्री सिरोंचा येथील मॉडेल स्कूलच्या शासकीय वसतिगृहात पाणी शिरल्याने तेथील ७६ विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू आणि पोलिसांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले. या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची सोय कस्तुरबा गांधी शाळेत करण्यात आली आहे. सिरोंचा माल (सूर्यारावपल्ली) येथील ४० घरांमध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरल्याने तेथील ३६ जणांना सुरक्षितरित्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हलविण्यात आले. आज (ता.१९ जुलै ) शुक्रवारी दुपारी पूर कमी झाल्यानंतर सर्व नागरिकांना त्यांच्या घरी परत पाठविण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडविले आहे.

गेली चोवीस तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड तालुक्यात ७७.७ मिलिमीटर पाऊस पडला असून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आल्याने, तेथून १ हजार १११ क्युमेक्स, तर गडचिरोली जिल्ह्यातील चिचडोह बॅरेजमधून ५ हजार ४२६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी व मोठ्या नाल्यांच्या तीरावरील गावांच्या नागरिकांनी सतर्क राहून संकटाच्या वेळी प्रशासनाची मदत घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.