पावसाचा कहर पाचव्या दिवशीही कायम, आणखी सोळा मार्गांची वाहतूक बंद,

पुरामुळे तीनशेहुन अधिक गावे संपर्काच्या बाहेर, बाजारपेठा ठप्प,

गडचिरोली;
जिल्ह्याच्या उत्तर-दक्षिण भागात मागील पाच दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस पडत असून नदी व नाल्यांच्या पुरामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने काल (ता.२०जुलै) शनिवारी चौदा राष्ट्रीय व राज्य महामार्गांची वाहतुक बंद केली, तर आज परत (ता. २१जुलै) रविवारी आणखी सोळा मार्गांची वाहतूक पोलिसांची तैनाती करून बंद केली आहे. त्यामुळे तीनशेहुन अधिक जगाच्या संपर्काच्या बाहेत गेले आहेत, गावखेड्यातील नागरिकांचा तालुका मुख्यालयावरचा राबता कमी होऊन बाजारपेठा सुनसान झाल्या दिसत असून किरकोड व ठोक साहित्य खरेदी व विक्री व्यवहार ठप्प झाला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पर्लकोटा, पामुलगौतम, दीना, वैनगंगा, बांडे, गोदावरी, गाढवी, या मोठ्या नद्या व इतर लहानमोठ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुरातुन प्रवास करताना जीवित हाणीचा धोका लक्षात घेऊन खबरदारी व सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने राज्य व राष्ट्रीय मुख्य मार्गावरील तीस ठिकाणची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली गेली आहे. रहदारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेल्या मार्गात प्रामुख्याने चंद्रा नाल्याला पूर आल्यामुळे आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग, वट्रा नाल्याला पूर आल्यामुळे मोयाबिनपेठा, अहेरी, गोलागर्जी, रेपनपल्ली, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ते छत्तीसगड राज्यसीमा मार्ग, पोर्ला वडधा, कुरखेडा, वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप, कोरेगाव, कुरखेडा, वैरागड, करवाफा पोटेगाव, गोठनगाव सोनसूरी, कुरखेडा, वडसा नवरगाव, आंधळी, चिखली, देसाईगंज, लखमापूर बोरी, गणपुर, हळदीमाल, भेंडाळा, अनखोडा, चामोर्शी, मुल, हरणघाट रस्ता दहेगाव, चामोर्शी, चांदेश्र्वर टोला, फोर्कुडी मार्कंडा देव, वडसा नैनपुर विठ्लगांव, कुरखेडा, चिखली धामदिटोला, गोठनगाव चांदगाव, आरमोरी, रमाळा आरमोरी, वैरागड, पेंढरी, ढोरगट्टा, बांडिया नदी धानोरा, भाडभिडी रेगडी देवदा, कोनसरी जामगड, सरखेडा, भापडा, चामोर्शी, फराळा मार्कडादेव, आरमोरी शंकरपुर, ठाणेगाव वैरागड, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग अशा मार्गांचा समावेश आहे.

सदरची रहदारी वाहतूक बंद होऊन पन्नास तासांपेक्षा अधिक कालावधी झाला असून पाऊस थांबून पूर ओसारण्याचे कोणतेही चिन्ह दिसून येत नाही, त्यामुळे आणखी काही तास वाहतूक बंद ठेवली जाणाची शक्यता आहे, जिल्ह्यातीन सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, कोरची, आरमोरी, गडचिरोली, कुरखेडा, धानोरा, वडसा व चामोर्शी या तालुक्यातील तीनशेहून अधिक गावे जगाच्या संपर्कातुन बाहेर गेली असून त्यांना जीवनावश्यक साहित्य मिळणे व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, घरांची पडझड होऊन जीवित व वित्त हानी होण्याचा धोकाही नाकारता येत नाही, जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापणाद्वारे आवश्यक मदत केली जात आहे, मात्र प्रशासनालाही सततच्या पावसामुळे मदत पोहचविण्यात अडथळा निर्माण होत आहे. पूर प्रभावित गावांमध्ये नागरिकांना आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी व जीवनावश्यक साहित्य मिळणे दुरापास्त झाले असून गरोदर माता, लहान बालके व वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याचा विविध समस्यांनीं ग्रासले आहे. त्यामुळे प्रशासने पूर पीडित गावांतील नागरिकांना जीवनावश्यक साहित्य पुरवठा व आरोग्याची मदत पोचविण्यासाठी विशेष व सक्षम यंत्रणेकडून भरीव मदत पोहचविण्याची आवश्यकता आहे.