अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावरून अजय कंकडालवार पायउतार!

बारा विरुद्ध पाच मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित,

अहेरी;(गडचिरोली)
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेस नेते अजय कंकडलवार यांच्या सत्तेला छेद देत. त्यांच्याच गटातील चार संचालकांनी विरोधातील बंड पुकारून अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटाला मदत केल्याने कंकडालवार यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव बारा विरुद्ध पाच मतांनी पारित करण्यात आला आहे.

गेल्या एक वर्षांपूर्वी एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी अजय कंकडालवार विराजमान झाले होते. अल्पावधीतच त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावरच अविश्वास ठराव पारित करण्याचे हत्यार विरोधकांनी वापरून त्यांना पायउतार करण्यात यश प्राप्त केले आहे.. त्यामुळे कंकडालवार हे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाच्या बळावर आपले राजकीय अस्तित्व टिकवून होते, त्यांच्या त्याच राजकीय अस्तित्वाला झटका बसला असून पुढील राजकीय वाटचालीला खिंडार पडल्याचे बोलल्या जात आहे.

अठरा सदस्यीय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कंकडालवार हे दोन ठिकाणाहून संचालक व अन्य आठ संचालकांचे त्यांना पाठबळ होते. दरम्यान त्यांनी एका ठिकाणी राजीनामा दिला होता. त्यामुळे संचालक मंडळाच्या संख्या सतरा झाली आहे. अजय कंकडालवार यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराला कंटाळून त्यांच्याच गटातील उपसभापती रवींद्रबाबा आत्राम, संचालक राकेश कुळमेथे, अनिल करमरकर, मालुबाई इष्टाम, सैनु आत्राम या संचालकांनी बंद उभारून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटात सामील होऊन कंकडालवारांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस जारी केली होती. हे विशेष!

विरोधक संचालकांच्या नोटिसवरून (ता. २८ ऑगस्ट) बुधवारी सहकार निबंधकांनी बोलविकेल्या सभेत अजय कंकडालवार यांच्या विरुद्ध राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटाने वर्चस्व राखून पाच विरुद्ध बारा अशा मताधिक्याने अविश्वास प्रस्ताव पारित केला आहे. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर नामदार आत्राम यांनी सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी बोलताना नामदार आत्राम यांनी पुढील कालावधीसाठी योग्य सभापतीची निवड करून सर्व संचालक मंडळाने शेतकरी हिताचे कामे करण्यास प्राधान्य देण्यावर भर देण्याचे आवाहन मार्गदर्शनातून केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.