दोन चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावरून वाहून आईवडिलांची पंधरा किमी चिखल तुडवत पायपीट,

जन्माचा अंधार, अज्ञान, अंधश्रद्धा की आरोग्य यंत्रणेची उणीव?

अहेरी;(गडचिरोली)
पोटाच्या गोळ्यांना अंगाखांद्यावर घेऊन खेळवायचे सोडून आईवडिलांवर त्यांची मृतदेह खांद्यावरून वाहून पंधरा किमी अंतर चिखल तुडवत पायी प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ ओढवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जन्माचा अंधार, अंधश्रद्धा की आरोग्य यंत्रणेच्या उनवेने कोवळे बालक बळी ठरले आहेत? असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून यंत्रणेला विचारला जात आहे.

बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) आणि दिनेश रमेश वेलादी (3 वर्ष), रा.येरांगडा ता.अहेरी, अशी त्या मृत बालकांची नावे आहेत. पोळ्याच्या सणानिमित्त मृतकांचे वडील रमेश वेलादी, आई यांनी दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांच्या मामाच्या गावाला पत्तीगाव येथे गेले होते. अचानक (ता.०३ सप्टेंबर) मंगळवारी दोघंही भावंड तापाने फणफनू लागले होते, आई वडीलांनी त्यांचे प्रकृतीवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पुजाऱ्याकडे घेऊन गेले. त्यांचा हाच निर्णय चुकीचा ठरून दोन्ही मुलांचा अंत होऊन आपणास पोरकं व्हावे याची पुसटशीही कल्पना या दाम्पत्यांना आली नसावी. तापाने फणफणणाऱ्या मुलांना आई-वडिलांनी एका पुजाऱ्याकडे नेऊन जडीबुटीने बालकांची प्रकृती सुधारण्याच्या भाबळ्या आशेवर उपचार घेतले, मात्र मुलांची प्रकृती सुधारणे सोडून आणखीच खालावली आणि यातच त्यांचा करून अंत झाला आहे.

मुलांच्या मृत्यूची कल्पना न आलेल्या, हतबल आई व वडिलांनी मुलांचा जीव वाचावा म्हणून पंधरा किलोमीटर अंतर कापत दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर उचलून घेऊन पायपीट करत जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. यावेळी मात्र उशिर झाला होता. अगोदर मोठा मुलगा बाजीराव तर दिड तासाने छोटा मुलगा दिनेश याच्या कोवळ्या देहांनी उपचार सुरू होण्यापूर्वीच प्राण त्यागले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा पासून रमेश वेलादी यांचे राहते गाव पत्तीगाव जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पक्का रस्ता नाही, त्यामुळे या गावात पोहचण्यासाठी चारचाकी वाहनाने जाण्यास अडचण आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून शववाहिका उपलब्द करून देण्यास दिरंगाई करण्यात आली होती. अशावेळी मृतदेहांचे शवपरिक्षण न करता आई-वडिलांनी दोन्ही मुलांचे मृतदेह स्वत:च्या खांद्यावर वाहून गावाकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. मृतदेह खांद्यावर घेऊन ते नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढत गावाकडे पायी चालत निघून गेले.

दरम्यान आरोग्य विभागाने देचलीपेठा येथून शववाहिकेची व्यवस्था केली, मात्र वेलादी दाम्पत्याने मृतदेहांवर उत्तरीय तपासणी केली जाण्याच्या भीतीने शववाहिकेतुन जाण्यास नकार दिल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बरेच अंतर पायी गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक दुचाकीने त्यांना घेण्यासाठी आले. त्यानंतर ते दोघंही भावंडांचे मृतदेह दुचाकीवरून पत्तीगावला पोहोचले आहेत. यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदन न झाल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नागरिकांना दळणवळणाची सोया व्हावी असे रस्ते अनेक गावापर्यंत पोहचलेले नाहीत. त्यामुळे रुग्णवाहिका, शववाहिका व आरोग्याच्या सोयी सुविधांच्या अभावामुळे अनेकांचे बळी जात आहेत. अशावेळी आजारी रुग्णावर उपचार करण्यासाठी नाईलाजास्तव पुजाऱ्यांकडून उपचार घ्यावा लागतो. त्यामुळे दुर्गम, मागास व आदिवासी बहुल भागात पक्के रस्ते निर्मिती करण्याची गरज आहे. रस्त्याचा अभाव आरोग्याची समस्या व शासन प्रशासनाची उदासीनता अशा विदारक अवस्थेत आणखी किती जीवांना प्राण गमवावे लागेल, असा संताप सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

सदर बालकांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन होणे आवश्यक आहे, बालकांच्या आई-वडिलांची समजूत काठाण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. मृतदेह परत रुग्णालयात आणून शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा पोलिसांकडून केला जात आहे.