रस्त्यावरील साचलेल्या पाण्याने भाजीपाला व फळांची स्वच्छता?

फळे विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासकीय कारवाहीची मागणी!

एटापल्ली;(गडचिरोली)
येथील बाजारात पावसाने साचलेल्या रस्त्यावरील घाण पाण्यात फळे व भाजीपाला धुऊन स्वच्छ करतानाचा किळसवाणा प्रकार एका जागृत व्यक्तीने कॅमेऱ्यातून चित्रित केला असून समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे, यामुळे फळे विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ केला जातो हे यातून दिसून येत आहे. सदरच्या प्रकाराची नगरपंचायत प्रशासनाने दाखल घेऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाहीची मागणी ग्राहक व नागरिकांमधून केली जात आहे.

सदरचा घाणेरडा प्रकार (ता.१० सप्टेंबर) मंगळवार सकाळी ११ वाजता दरम्यान एटापल्लीच्या आठवडी बाजारात घडला आहे. बाजारात प्रवेश करतांनाचे पंचायत समिती संकुल परिसरातील गेट जवळ पावसाचे अस्वच्छ पाणी साचलेले असून, याच पाण्यात फळांची स्वच्छता केली जात असल्याचे चित्रिकारणातून दिसून येत आहे. प्रदूषित पाण्यामुळे फळांवर विविध प्रकारच्या दूषित किटाणूचा प्रादुर्भाव होऊन फळे सेवन करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचे नाकारता येत नाही. यातून गंभीर आजार होऊन अनेकांची शारीरिक व जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या रस्त्यावरील घाण पाण्यात फळांची स्वच्छता करणाऱ्या फळ विक्रेत्यांची चौकशी करून दोषी फळ विक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सदरच्या प्रकाराबाबत नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी विचारणा केली असता, प्रशासन अधिकारी शिवाजी रसाळ, कनिष्ठ अभियंता सौरभ नंदनवार व कर्मचाऱ्यांचे पथक नेमून संबंधित फळ विक्रेत्यांची चौकशी करून कारवाही केली जाईल असे “जनकत्व” न्युज नेटवर्कशी बोलतांना सांगितले आहे.