अवैध दारू तस्कर डॉ ब्रह्मनंद पुंगाटी अडकला पोलिसांच्या जाळ्यात,

शासकीय रुग्णवाहिकेतून अवैध दारूची वाहतूक करतांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील पिपली बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डॉ ब्रह्मनंद पुंगाटी, याला शासकीय रुग्णवाहिका मधून अवैध दारूची तस्करी करतांना हालेवारा पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केल्याची बाब उघड झाली आहे. त्याला अहेरी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय रुग्णवाहिकेवर पाळत ठेऊन, (ता.१५ सप्टेंबर) रविवारी रात्री पोलिसांनी एम एच ३३ टी ४४७८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या तपासणीतून डॉ पुंगाटी याला पंचाहत्तर हजार रुपये किंमतीच्या पंधरा पेट्या विदेशी दारूची वाहतूक करून तस्करी करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची दारू वैद्यकीय अधिकारी ब्रह्मनंद पुंगाटी हा अवैधरित्या तस्करी करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवा ढेपळलेली असून आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नवनवीन कारनामे दररोज उघड होतांना दिसून येत आहेत, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील एरंगडा येथील बाजीराव रमेश वेलादी (०६) व दिनेश रमेश वेलादी (०३) या दोन चिमुकल्या सख्या भावांच्या मृत्यू पश्चात जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी मृतक भावांचा मृतदेह घरी पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका अथवा शेववाहिका उपलब्द करून दिली नव्हती, त्यामुळे आईवडिलांनी या दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पंधरा किमी अंतराचा प्रवास चिखल तुडवत पूर्ण केला होता, ही घटना ताजीच असतांना ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवतांना डॉक्टरांनाच्या कर्तुत्वाला लकवा मारतो, त्याच वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीडित रुग्ण अंधश्रद्धेचा बळी ठरल्याची सारवासारव करून दोषी आरोग्य अधिकाऱ्यांची पाठराखण केली जाते. त्यामुळे डॉ पुंगाटी व अन्य काही डॉक्टर्स आता अवैध दारूच्या व्यवसायात शासकीय रुग्णवाहिका वापरून गुंतले आहेत की काय अशी शंका घेण्यास या घटनेतून वाव मिळत आहे. हे मात्र निश्चित!

दुसऱ्या एका घटनेत गेल्या महिन्यात एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डॉ मानकर हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने अपघातग्रस्त रुग्णांवरवर वेळेत उपचार न झाल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यामुळे आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी मद्य विक्री व मद्यधुंद अवस्थेत राहतात हे यातून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य आदिवासी नागरिकांच्या आरोग्य समस्यांवर उपचारार्थ गावठी मांत्रिक व पुजाऱ्यांकडून उपचार घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. हे विशेष!
वैद्यकीय अधिकारी डॉ ब्रह्मनंद पुंगाटी याचेवर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या सेवा समाप्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आरुषी सिंग यांच्याकडे सादर केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन कन्नके यांनी दिली आहे. अवैध दारू तस्कर वैद्यकीय अधिकारी डॉ ब्रह्मनंद पुंगाटी याला अटक करून पोलिसांनी त्याला अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून घटनेचा पुढील तपास हालेवारा पोलिसांकडून केला जात आहे.