“जनकत्व” न्युज नेटवर्कच्या बातमीची प्रशासनाकडून दखल!
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील नगरपंचायतच्या मेहेरबानीने शहरातील नालीमधील घाण एक आठवड्यापासून रस्त्यावर काढून टाकलेली असल्याची बातमी जनकत्व न्युज नेटवर्कने (ता.२७) शुक्रवारी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच नगरपंचायत प्रशासन खडबळून जागे झाले आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाने रस्त्यावर पसरवून टाकलेली आरोग्यासाठी हानिकारक दुर्गंधीयुक्त घाण त्याच दिवशी तात्काळ हटविण्यात आली आहे. सदरच्या घाणीचा तत्परतेने विल्हेवाट लावल्यामुळे मुख्याधिकारी प्रणय तांबे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.
शहरातील नाल्या सफाई कधीतरी दोन ते तीन वर्षात एखाद्या वेळी केली जात असून कंत्राटदार व नगरपंचायत प्रशासनाच्या साठगाठीतून शहराच्या सोयीसुविधा थातूरमथुर केल्या जाण्याची प्रथा प्रशासनात रूढ झाली आहे. सदरची प्रथा दोन वर्षांपूर्वी येथील नगरपंचायतचा प्रभार सांभाळणारे भ्रष्ट आयएएस शुभम गुप्ता यांच्या कर्तृत्वातून सुरू झाली आहे, तीच प्रथा नगरपंचायत प्रशासनाकडून परंपरा म्हणून पाळली जाऊन विकास कामांचे कंत्राट मंजूर करतांना प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे गुप्ता यांच्या कार्यकाळापासून काळाबाजारीत लिप्त असलेले कंत्राटदार आजही प्रशासनाच्या साठगाठीतून कंत्राट मिळविण्यास सफल होत आहेत. आणि नगरपंचायत प्रशासनात रूढ झाले आहेत. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामे थातूरमथुर व कागदोपत्री पूर्ण झाल्याचे रेकॉर्ड तयार करून प्रशासनाच्या संगनमताने विकास निधीवर डल्ला मारला जाण्याची बाब लपून राहत नाही. हे मात्र निश्चित!
त्यामुळे मागास, अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी भागातील शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दिला जाणारा करोडो रुपयेचा विकास निधी नियोजनबद्ध पद्धतीने कागदोपत्री खर्च दाखवून नागरी विकास भकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा गैरकारभारातून कंत्राटदार व साठगाठीत सामील प्रशासकीय यंत्रणेतील कमिशनखोर मात्र मालामाल होत असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. त्यामुळे कंत्राटदार व नगरपंचायत प्रशासनातील कमिशनखोरांच्या संगनमताने विकास निधीत होत असलेली लूटीला लगाम लावून, बिघडलेला गलथान कारभार सुधारणा घडविवून रखडलेला शहराचा सर्वांगीण विकास गतिमान करण्याची मागणी मुख्याधिकारी प्रणय तांबे यांच्याकडे नागरिकांकडून केली जात आहे.