अहेरी विधानसभा निवडणुकीसाठी नितीन पदा यांना ग्रामसभांची पसंती!

ऍड लालसु नोगोटी, नंदू मट्टामी यांची माघार तर सैनू गोटा यांना नकार!

गडचिरोली;
जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी आदिवासी व पारंपरिक वनविवासी समुदायाच्या ग्रामसभांकडून स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी मिळण्यासाठी ऍड लालसू नोगोटे, सैनू गोटा, नंदू मट्टामी व नितीन पदा यांनी दावेदार केली होती. मात्र (ता.०१ ऑक्टोंबर) मंगळवारी पाच ते दहा हजार नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत नितीन पदा राहणार पैडी यांना एकमुखाने पसंती दर्शविण्यात आली आहे.

एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे (ता.०१) मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीत ग्रामसभेच्या प्रतिनिधीला स्वतंत्र उमेदवार म्हणून उभा करण्यासाठी अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड व सिरोंचा या पाचही तालुक्यातील ग्रामसभांच्या वतीने उमेदवार निवडण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती, यापूर्वी (ता. २३ सप्टेंबर) सोमवारी चंदनवेली येथे झालेल्या सभेत ऍड लालसू नोगोटी, सैनू गोटा, नितीन पदा व नंदू मट्टामी या चार इच्छुकांची नावे पुढे आली होती, यावेळी भाजप प्रणित महायुती, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व इतर पक्ष, संघटनांच्या उमेदवारांना तगड़ा पर्याय म्हणून ग्रामसभेचा उमेदवारी देण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.

आगामी निवडणुकीत अहेरी विधानसभासाठी ग्रामसभेची ताकद एकवटून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला भराघोष मतांनी निवडून येण्याच्या उद्देशाने इच्छुकांमधील ऍड लालासु नोगोटी व नंदू मट्टामी, यांनी माघार घेत योग्य उमेदवाराच्या निवडीचे सर्वाधिकार उपस्थित नागरिकांना दिले होते, यावेळी सभेच्या आयोजकांकडून सैनू गोटा व नितीन पदा यांच्या नावांवर जाहीर पसंती मागण्यात आली नागरिकांमधून सैनू गोटा यांच्या उमेदवारीला नकार देत नितीन पदा यांना सर्व नागरिकांना हात उंचावत व घोषणांच्या गजरात पसंती दर्शविण्यात आली आहे. उमेदवारीवर विस्तारित चर्चा करून अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचरा या पाच तालुक्यातील विविध गाव ग्रामसभांच्या सहमतीने नितीन पदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आदिवासी व पारंपरिक निवासी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी सभेचे अध्यक्ष सुधाकर गोटा हे होते, प्रास्ताविक शिवाजी नरोटे, व नानेश गावडे यांनी केले तर सूत्र संचालन कोत्तु पोटावी यांनी केले, सभेला मार्गदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी, माजी सरपंच नंदू मट्टामी, कोवे महाराज, शिशु नरोटे, माजी सरपंच केसरी तेलामी, जयश्री लेकामी, संतोष महा, सूर्यप्रकाश चांदेकर, डोलेश तलांडे, देवीदास मट्टामी व मंगेश हलामी आदी मान्यवरांनी सामाजिक एकोप्यातून जल, जंगल, जमीन व संसाधनांच्या रक्षणाचा लढा तीव्र करण्यावर भर देण्यात आली आहे. ग्रामसभांकडून नितीन पदा यांची एकमताने उमेदवारी निश्चित झाल्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता परतली असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.