गांधी जयंती दिनी विद्यार्थी आरो दुरुस्ती खर्चाच्या वर्गणी मोहिमेवर?

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोडसाचा अजब उपक्रम, पालकांमध्ये संताप!

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नादुरुस्त पाणी शुद्धीकरण यंत्र (आरो) दुरुस्तीसाठी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना दारोदार जाऊन वर्गणी गोळा करण्याचे अजब फर्मान सोडून शाळकरी विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन वेळात वर्गणी गोळा करण्यास भाग पाडल्याची संतापजनक बाब पुढे आली आहे.

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र प्रत्यक्ष शाळेत उपलब्द करून दिले आहे. तसेच त्याची देखभाल दुरुस्ती शाळा व्यवस्थापनाने करण्याचे नियम आहेत. मात्र तोडसाच्या शाळा प्रशासनाने नियमबाह्यरीत्या विद्यार्थ्यांना गावात फिरवून वर्गणी गोळा केल्याचा नवीनच उपक्रम केल्याचं प्रकार पुढे आला आहे. एकीकडे देशभरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयात थोर महात्मा गांधी यांच्या जयंती साजरी केली जात असतांना तोडसाच्या शाळेतील विद्यार्थी मात्र नियमबाह्य गावात दारोदार भटकंती करून आरो दुरुस्तीसाठी वर्गणीचे पैसे गोळा करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. यात विद्यार्थी त्यांना शाळेकडून चालू सत्रात गणवेश मिळाला नसल्याचे व जल शुद्धीकरण यंत्र दुरुस्तीसाठी गावात फिरून वर्गणी गोळा करत असल्याचे या विद्यार्थींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अशा नियमबाह्य कृतीची चौकशी करून दोषींवर कारवाहीची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास पुंगाटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पंचायत समिती एटापल्लीचे गटशिक्षणाधिकारी हृषीकेश बुरडकर यांना विचारणा केली असता. त्यांनी शाळेच्या काही सोयीसुविधा पूर्ण करतांना लोक सहभाग व वर्गणीतून केल्या जात असतात. त्यामुळे लोक वर्गणी केली जाऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांना गावात फिरवून जल शुद्धीकरण यंत्र दुरुस्तीसाठी वर्गणी गोळा करणे हे गैर आहे. सदरच्या प्रकारची सखोल चौकशी करून उचित कारवाही करण्यात येईल. असे त्यांनी जनकत्व न्युज नेटवर्कशी बोलतांना सांगितले आहे.