अहेरीत राजे अम्ब्रिशरावांचा ऑटोरिक्षा सुसाट धावला?

विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, बेरोजगार युवक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांचा अभूतपूर्व पाठींबा!

अहेरी;(गडचिरोली)
विधानसभा निवडणुकीत नागविदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष, अपक्ष उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कुशल नेतृत्व, शांत संयमी स्वभाव, तरुण व तडफदार निष्कलंकीत व्यक्तित्वावर विश्वास ठेवून, विविध राजकीय पक्ष संघटना, बेरोजगार युवक-युवती, शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांचा अभूतपूर्व पाठींबा मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या ऑटोरिक्षा चिन्हावर मतदारांनी भरभरून मतांचा वर्षाव केल्याचे बोलल्या जात असून राज्य विधिमंडळाचे आमदार म्हणून विजयाची माळ राजे अम्ब्रिशराव यांच्या गळ्यात पडण्याचे निश्चित मानला जात आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ च्या रणधुमाळीत सर्वात हॉटशीत म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. (ता.२० नोव्हेंबर) बुधवारी झालेल्या मतदानाचे (ता. २३) शनिवारी सकाळी पासून मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या, आदिवासी समाजाच्या हक्काची जल, जंगल व जमिनीच्या रक्षण, तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या प्रश्नावर संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड व चिरोंचा अशा पाचही तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले होते, याच मुद्द्यांना हेरून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती, त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकरत्ये महिला बचत गट व महिला मंडळांसह आदिवासी, दलित (बौद्ध), मुस्लिम, कोमटी, ओबीसी, ओराव (ख्रिश्चन) व बंगाली समाज बांधव, विविध शिक्षक संघटना, शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना, विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, अंगणवाडी सेविकांच्या संघटना, सफाई कामगार संघटना आणि वृद्ध नागरिक अशा सर्वच स्तरातील संघटना आणि मतदार नागरिक राजे अम्ब्रिशरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे झाल्याचे चित्र निर्माण झाले होते, त्यामुळे अभूतपूर्व मताधिक्य घेऊन राजे अम्ब्रिशराव राज्य विधानसभेत पोहचण्याचा मार्ग सोपी झाल्याचे दिसून आले आहे.

*नामदार धर्मरावबाब आत्राम यांना लागले नाराजांचे ग्रहण!*

साडेचार वर्ष सोबत राहून सल्लामसलतीने काम करणारी मुलगी भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या नाराजीतून नाराजांचे बंडाळीचे सत्र सुरू होऊन सामान्य मतदारांपर्यंत येऊन पोचले, त्यामुळे नामदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांचे सुरवातीपासूनच प्रचारात पीछेहाट होत गेल्याची चर्चा केली जात आहे. यावेळी महायुतीकडून वडील नामदार धर्मरावबाबा आत्राम व महाविकास आघाडीकडून मुलगी भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उमेदवारीवर दोन्ही आघाडीतील घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकरत्ये व मतदार नागरिकांमधून नापसंतीचा सूर आवळला जात होता. त्यामुळेच भाजपचे वरिष्ठ नेते अपक्ष उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम हे दिवसागणिक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत होते.

अहेरी विधानसभा निवडणूकीत आदिवासी व पारंपरिक वन निवासी मतदारांकडून जल, जंगल, जमीन बचाव व सुरजागडसह प्रस्तावित अन्य लोहखनिज उत्खनन विरोधातील आंदोलन हा कळीचा मुद्दा होता. अशा आंदोलनातील आदिवासी समाज व ग्रामसभांच्या समर्थानात उतरणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनतेने नेहमीच झुकते माप देऊन विजयी केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ नामदेव किरसान यांनी या मुद्द्यांना समर्थन दर्शविल्याने त्यांना ग्रामसभांच्या पाठबळावर भरघोष मताधिक्य घेऊन लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी प्राप्त झाली, हे उल्लेखनीय आहे!

*अम्ब्रिशरावांनी हेरल्या जनसामान्यांच्या समस्या*

निवडणुकीत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी विधासभेतील जर्जर झालेले रस्ते, वीज, पिण्याचे शुद्ध पाणी, शिक्षण, शेती सिंचन, बेरोजगारी, प्रशासनाची सामान्य नागरिकांवरील दडपशाही व सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील मनमानी कारभार अशा ज्वलंत प्रश्नांना हात घालून सामान्य मतदारांचा पाठींबा मिळविण्यात त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेच्या निवडणुकीत राजे अम्ब्रिशराव हे अभूतपूर्व मताधिक्य घेऊन निवडणूक जिंकण्याची अशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांच्या या झंझावाताचा निर्णय येत्या दोनदिवसांत (ता.२३ नोव्हेंबर) शनिवारी होणाऱ्या मतमीजणीतून पुढे येणारे यात शंका वाटत नाही. मात्र आगामी काळात गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या नागविदर्भ आंदोलन समितीने घेतलेल्या उभारीतुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणते परिवर्तन घडविले जाते याकडे राजकीय जाणकार व नागरिकांचे पक्ष लागलेले आहे. राजेंचा राजकीय प्रवासाचा पुनर्स्थापित रथ २०२४ च्या राज्य विधिमंडळात कॅबिनेट मंत्री पदावर विराजमान होण्याची अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते व मतदार नागरिकांकडून केली जात आहे.

*राजेंच्या बंडखोरीला भाजपची साथ! हनुमंतुकडे मात्र काँग्रेसने फिरविली पाठ!*

महायुतीच्या जागावाटपात अहेरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अप) गटाच्या वाट्याला जाऊन विद्यमान मंत्री डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी प्राप्त झाली होती, तर महाविकास आघाडीच्या कोट्यातील उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या भाग्यश्रीताई आत्राम यांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यास यश मिळविले होती. महायुती व महाविकास आघाडीच्या खेळात भाजपचे वरिष्ठ नेते राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर काँग्रेसचे आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष हनुमंतु मडावी यांनी बंडखोरीचे दंड थोटाऊन उमेदवारी दाखल करत मैदानात उतरले आहे, मात्र या दोन्ही राष्ट्रीय पक्षात झालेल्या बंडखोरांमध्ये राजे अम्ब्रिशराव यांच्या प्रचार कामात भाजप पदाधिकारी, कार्यकरत्ये मोठ्या उत्साहाने, जोमाने व खंबीरपणे उभे असल्याचे दिसून आले, तर हनुमंतु मडावी यांच्या प्रचारकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरविल्याचे कोणापासूनही लपून राहिले नाही, त्यामुळे राजे अम्ब्रिशरावांचा ऑटोरिक्षा हे निवडणूक चिन्ह सुसाट धावल्याची खमंग चर्चा संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये केली जात आहे.