अहेरीतुन डॉ धर्मरावबाबा आत्राम घवघवीत मताधिक्याने विजयी!

अपक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा १६,८१४ मतांनी केला पराभव!

अहेरी;(गडचिरोली)
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जेष्ठ नेते डॉ धर्मरावबाबा आत्राम यांनी एकतर्फ ५३,९७८ मते घेऊन प्रतिस्पर्धी नागविदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष, अपक्ष उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम याचा १६,८१४ मतांनी पराभव करून घवघवीत मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ च्या रणधुमाळीत सर्वात हॉटशीत व प्रतिष्ठेची म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. सदरच्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम, भाजपचे वरिष्ठ नेते तथा नागविदर्भ आंदोलन समितीचे नेते, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. (ता.२० नोव्हेंबर) बुधवारी झालेल्या मतदानाचे (ता. २३) शनिवारी सकाळी पासून मतमोजणी सुरू झाली. यावेळी सुरवातीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मंत्री डॉ धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतलेली आघाडी कायम राखत शेवटच्या फेरी पर्यंत १६,८१४ मताधिक्याच्या फरकाने विजय संपादन केला आहे.

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व २२ फेऱ्यात मोजणी झालेल्या एकूण १,८५,८६४ मतदानातुन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना ५३,९७८ मते, अपक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना ३७,१२१ मते, महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना ३५,५६९ मते, अपक्ष हनुमंतु मडावी यांना २७,०३४ मते, अपक्ष दिपकदादा आत्राम यांना ६५५१ मते, ग्रामसभा पुरस्कृत अपक्ष नितीन पदा यांना ५६३८ मते, अपक्ष भाग्यश्री लेखामी यांना ३९०२ मते, मनसेचे संदीप कोरेत यांना २९६० मते, बसपाचे रमेश गावडे यांना २९५३ मते, अपक्ष शैलेश गेडाम यांना १३३९ मते, प्रहार जनशक्तीच्या नीता तलांडी यांना १२१४ मते, अपक्ष महेश कुसराम यांना १११२ मते तर नोटाला ५८२५ अशी मतांचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ धर्मरावबाबा आत्राम हे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना मात देऊन घवघवीत १६,८१४ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाचा जल्लोष महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, त्यांचा चाहता वर्ग व मतदारांमध्ये मोठ्या उत्साहात केला जात आहे. डॉ धर्मरावबाबा आत्राम हे गेल्या मंत्रिमंडळात अन्न व औषधी प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री होते, राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडणूक जिंकून आले आहेत. त्यामुळे राज्यात परत एकदा महायुतीची सत्ता स्थापन होणार हे निश्चित!

स्थापित सरकारच्या मंत्रिमंडळात डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना महत्त्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री मिळण्याची शाश्वती मतदार नागरिकांमधून वर्तविली जात आहे.