भामरागड तालुक्यातील फुलणार गाव जंगल परिसर उडाली चकमक,
भामरागड; (गडचिरोली)
तालुक्याला लागून छत्तीसगड राज्य सीमेवरील दिरंगी, फुलणार गाव जंगल परिसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील जवान महेश नागुलवार (वय ३९) हे शहीद झाले आहे. शहिद पोलीस जवान महेश नागुलवार हे चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावचे रहिवासी आहेत.
गेल्या आठवड्यात (ता. ०१ फेब्रुवारी) भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची नक्षल्यांनी हत्या केली होती, त्या घटनेपासून पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम राबवून नक्षल्यांचा शोध घेतला जात आहे. अशातच छत्तीसगड राज्य सीमावर्ती भागात दिरंगी आणि फुलणार गाव जंगल परिसरात काही दिवसांपासून नक्षली वावरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांचे नक्षलविरोधी सी ६० व सीआरपीएफ अशा दोन पथकांकडून नक्षल शोध मोहीम राबविली जातांना (ता. ११ फेब्रुवारी) मंगळवारी जंगलात दाब धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र चकमकीदरम्यान सी ६० पथकाचा जवान महेश नागुलवार याला गोळी लागली, जखमी महेश नागुलवार यांना पोलीस प्रशासनाकडून तातळीने उपयोजना करून हेलिकॉप्टरने उपाचारार्थ गडचिरोली येथे घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र नागुलवार यांचेवर उपचार होण्यापूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
चकमकीच्यावेळी २५ ते ३० नक्षलवादी जंगल परिसरात असल्याची माहिती पोलिसांना असून यात नक्षल नेता रघुसह काही मोठे कमांडर हजार असल्याची माहिती आहे. चकमक परिसर घनदाट जंगल व्याप्त असून पोलिसांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षलवाद्यांशी लढा दिला आहे. गेल्या चार वर्षात पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाली आहे. त्यामुळे मागील चार वर्षात एकही जवान शहीद झालेला नाही.
शहीद जवान महेश नागुलवार हे २०१२ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. एक वर्षापूर्वी महेशने गडचिरोली शहरात घर बांधले आहे. त्यांच्या पश्चात राज्य परिवहन महामंडळात नोकरीवर असलेली पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. शहीद महेश नागुलावार यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.