दोन वेगवेगळ्या घटनांत विहिरीच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू,

एक शाळकरी विद्यार्थी, तर दुसरा शेतकरी,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील डुम्मे येथील निखिल सदाशिव दुर्वा (१७ वर्ष) या शाळकरी विद्यार्थ्यांचा स्वतःच्या शेतातील विहिरीत पडून बुडल्याने तर उडेरा येथील शैलेश घिसा महाका (33 वर्ष) या शेतकऱ्यांचा शेजाऱ्याच्या शेतातील विहिरीत पडून पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला आहे. या दोघांचाही स्वातंत्र्य दिनी दुर्दैवी अंत झाल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.

निखिल दुर्वा हा बोम्मनवार विद्यालय चामोर्शी येथे इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. (ता.१५ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यावर तो आपल्या शेतात भात पिकाचे रोवणी काम करण्यासाठी गेला होता, दुपारी दोन वाजता दरम्यान जेवण करण्यापूर्वी शेतातील विहिरीवरून पिण्याचे पाणी काढतांना त्याचा तोल जाऊन तो विहिरीतील खोल पाण्यात बुडाला होता. ही बाब शेतात काम करणाऱ्या त्याच्या नातेवाहिकांच्या लक्षात आली, लागलीच नातेवाहिकांनी त्याला विहिरीच्या बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र विहिरीचे पाणी खोल असल्याने बराच वेळ निखिलचा काही थांगपत्ता लागला नाही. नंतर बऱ्याच वेळाने काटेरी गळ टाकून शोध घेतला असता, गळाला लागून त्याचा मृतदेहच बाहेर आला, दुसऱ्या घटनेतील शैलेश महाका हा मिरगी या आजारग्रस्त शेतकरी (ता.१५ ऑगस्ट) गुरुवारी सकाळी दरम्यान आपल्या शेतात धान रोवणीच्या कामासाठी जात असतांना वाट्यातील शेजारी शेतकऱ्याच्या शेतातील बांधकाम विरहित विहिरीच्या खोल खड्ड्यात पडला होता. सदरचे शेत गावाच्या शेजारीच असल्याने ही बाब नागरिकांच्या लक्षात आली, लागलीच शैलेश याला विहिरीच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र त्याला मिरगीचा झटका येऊन खोल पाण्यात पडून बुडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

सदरच्या दोन्ही दुःखद घटना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावरून दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन्ही घटनेचा पंचनामा करून मृतदेहांची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.