अहेरी विधानसभा आखाडयात ग्रामसभा उमेदवार उतरविण्याच्या तयारीत!

चार इच्छुकांची दावेदारी, महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना तगडा पर्याय देण्यावर मंथन,

एटापल्ली;(गडचिरोली)
राज्य विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच विविध पक्ष संघटनांकडून उमेदवारांची चाचपनी केली जाता असतांना, अहेरी विधानसभा मतदार संघातील दिग्गज अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचा निवडणूक पूर्व जनसंपर्काचा झंझावात सुरू असतांना ग्रामसभांनी मात्र स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. सदरची उमेदवारी मिळण्यासाठी ऍड लालसू नोगोटे, सैनू गोटा, नंदू मट्टामी व नितीन पदा यांनी दावेदार केली आहे.

एटापल्ली उपविभागातील संयुक्त ग्रामसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या (ता. २३ सप्टेंबर) सोमवारी एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे झालेल्या सभेत आगामी विधानसभा निवडणुकीत ग्रामसभांचा प्रतिनिधी उतारविन्यावर चर्चा करण्यात आली, यावेळी भाजप प्रणित महायुती, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व इतर पक्ष संघटनांच्या उमेदवारांना तगड़ा पर्याय म्हणून ग्रामसभेचा उमेदवारी देण्याचा ठराव शिवाजी नरोटे यांनी मांडला, ठरावाला माजी जिल्हा परिषद सदस्य कारू रापंजी, अडवे नरोटे, मारोती रापंजी, महादेव पदा, कोवे महाराज, वनिता तिग्गा, फाकरी दुर्वा, केशव कुळयेटी, बुकलू लेकामी, राजू कलांगा, इरपा मडावी, रमेश वेलादी, शिला गोटा, गीता मट्टामी, शेवंता पदा, चीन्ना महाका, राजू कुरसामी, रमको कुळयेटी, रेश्मा रापंजी, ललिता कुळयेटी, कुनी कालंगा, चमरू वेळदा, व राजेश मडावी, आदी ग्रामसभांच्या प्रमुख प्रतिनिधीनी संमती दर्शविली आहे,

आगामी निवडणुकीत अहेरी विधानसभासाठी ग्रामसभेचा उमेदवार दिला जाणार असल्याने इच्छुक ऍड लालासु नोगोटी, सैनू गोटा, नंदू मट्टामी व नितीन पदा यांच्या नावे पुढे आली आहेत. त्यावर विस्तारित चर्चा करून अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचरा या पाच तालुक्यातील गाव ग्रामसभांच्या सहमतीने एका नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याचे ठरविण्यात आले आहे.

यापूर्वी ग्रामसभांना सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार उभे करून लोकशाहीच्या मार्गातून मागास आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्याचा पहिला प्रयोग सन २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत एटापल्ली तालुक्यातुन सैनु गोटा व भामरागड तालुक्यातुन ऍड. लालसु नोगोटी हे निवडणूक जिंकून आले होते, तसेच भामरागड पंचायत समितीत सुखराम मडावी, गोईबाई कोडपे व प्रमिला कुडयामी निवडणूक जिंकून पंचायत समितीवर अविरोध सत्ता स्थापन केली आहे, एटापल्ली पंचायत समितीत शिला गोटा या निवडनुक जिंकल्या होत्या, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या प्रयोगाची चर्चा झाली होती, ग्रामसभांकडून उमेदवार दिला जात असल्याने अहेरी विधानसभा निवडणुक रंगतदार होईल असे बोलले जात आहे. यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी, ग्रामसभा प्रतिनिधी, महिला मंडळ प्रतिनिधी, युवक मंडळ प्रतिनिधी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.