अहेरी;(गडचिरोली)
तालुक्यातील वडलापेठ येथे प्रस्तावित सुरजागड इस्पात प्रकल्प संबधी गडचिरोलीत येत्या (दि. २४ मार्च) सोमवारी जनसुनावनी घेतली जाणार आहे, सदर जनसुनावणीला आक्षेप घेत जनसुनावणी अहेरी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याची मागणी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली असून लॉयल्डस मेटल व तत्सम कंपण्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध तीव्र आंदोलनाचे बिगुल राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून फुंकले आहे.
राणी रुक्मिणी महालात (दि. २२ मार्च) शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना राजे अम्ब्रिशराव यांनी यापुर्वीच्या सुरजागड लोहखनिज प्रकल्प जनसुनावनी जनतेसाठी फार्स ठरले असून स्थानिक जनतेला आपली बाजू योग्य प्रकारे मांडू न देता लॉयल्डस मेटल कंपनीकडून दडपशाहीची वर्तणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जनसुनावनी प्रसंगी मोजक्या, नेमक्या व अनुकूल लोकांना ऊभे करून कंपनीसाठी अनुकूल असलेले वाक्य संबंधितांकडून वदवून घेतल्या जात असल्याचेही राजे अम्ब्रिशराव यांनी निर्देशित केले आहे. जनसुनावनी घेतांना सर्रासपणे कायद्याची पायमल्ली केली गेल्याचे सुरजागड व इतर लोहखनिज प्रकल्प प्रसंगी आढळून आले आहे. इतर कोणीही सामान्य व्यक्ती जनसुनावणी परिसराच्या आसपासही भटकू शकणार नाही, असा चोख बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यामागचा हेतू काय? असा सवाल राजे अम्ब्रिशराव यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक वेळी सुरक्षेचे निमित्य साधून गडचिरोलीला जनसुनावनी घेतली जाते. अहेरी तालुक्यात आता गैरकृत्य करणाऱ्या शक्तींचे प्रस्थ फारसे शिल्लक नाही, हे प्रशासनाही माहीत आहे. त्यामुळे नियमानुसार प्रस्तावित प्रकल्प परिसरातच जनसुनावणी घेतली पाहीजे आणि प्रत्येक गोरगरीब आदिवासींना भयमुक्त वातावरणात आपले मत मांडण्याची संधी मिळायला पाहीजे, हा त्यांचा हक्कच आहे. अशी सूचना राजे आत्राम यांनी केली आहे.
पत्रकाराच्या प्रश्नाला ऊत्तर देतांना जनसुनावणी अहेरीत घेण्यासंबंधी मुख्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे राजे अम्ब्रिशराव यांनी सांगितले आहे. गडचिरोलीत घेतल्या जाणाऱ्या जनसुनावनीला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असुन जनसुनावनी अहेरीतच घेतली जाण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र जन आंदोलन उभाले जाण्याचा इशारा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सुरजागड लोह प्रकल्पात लॉयल्डस लेटलचा सावळा गोंधळ?
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात लॉयल्डस मेटल कंपनी प्रशासनाकडून स्थनिकांना बेरोजगारांना डावलून बाहेरील युवकांना रोजगार देणे, स्थनिकांना तांत्रिक प्रशिक्षण न देणे, रस्ताची दुरावस्था, मोठ्या प्रमाणावर होत असलेले वन प्रदूषण, दलालांचा प्रत्येक बाबीत हस्तक्षेप त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता कमालीचे हैराण झाली, असून ही परिस्थिती बदलली नाही, तर लवकरच जन सहभागाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा पत्रकार परिषदेत राजे अम्ब्रीशराव महाराजांनी दिला आहे. कंपनी प्रशासनाने स्थनिकांना रोजगार देऊन अहेरी विधानसभा क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळण्याची अपेक्षा माजी मंत्री राजे आत्राम यांनी केली आहे.